मुंबई : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत शनिवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात तर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली असून, नागरिक छत्र्यांचा आधार घेत पावसातून वाट काढताना दिसत आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भिवंडी अनेक ठिकाणी पावसाच्या पाणी सकल भागात साचण्यास सुरुवात झाले आहे. वलपाडा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. शिवाय या परिसरात केमिकल गोदामाला आग लागली असून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. पावसाच्या अचानक हजेरीमुळे नागरिकांचे एकच तारांबळ उडाली आहेत.
रायगडच्या लोणेरे विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. उनेगाव वावे गावात मुसळधार पावसामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागलेत. सलग अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे गावाला नदीचे स्वरुप आले आहे.
अमरावती शहरासह अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. बच्चू कडू यांनी उपोषण केलेल्या मोझरीमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्या ठिकाणी बच्चू कडू उपोषणाला बसले त्या मंडपात पाणीच पाणी साचलं आहे.
फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पश्चिम भागात खडकी, मिरगाव खिंड परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील तलाव ओव्हर फ्लो झाल्याने संपूर्ण पाणी हे फलटण सातारा रोडवर आल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.फलटण ते आदर्की फाटा रस्त्याचे सध्या काँक्रीट करण्याचे काम जोरदार सुरू आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते.
ठाण्यात पाणी साचले
ठाणे शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वंदना डेपो परिसरात पुन्हा पाणी साचले आहे. पंप लावून पाण्याचा निचरा होत नाही. संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत. मध्य रेल्वेवर अद्याप कोणताही परिणाम नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे.