Mumbai : आयआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; आणखी एक आत्महत्या, छळ करून हत्या झाल्याचा आईचा आरोप (Photo - Vijay Gohil)
मुंबई

Mumbai : आयआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; आणखी एक आत्महत्या, छळ करून हत्या झाल्याचा आईचा आरोप

परीक्षेत मोबाईल फोनवापरताना पकडल्या गेल्यानंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : परीक्षेत मोबाईल फोनवापरताना पकडल्या गेल्यानंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर साहिलच्या आईने प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाचा छळ करण्यात आला आणि त्याची हत्या झाली, मला न्याय हवा आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

पोलिसांनी शनिवारी या घटनेची माहिती दिली. साहिल रवींद्र वाकोडे असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून तो यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी होता. शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरातील आयआयटी कॅम्पसच्या वसतिगृह क्रमांक ४ मधील त्याच्या खोलीत तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. साहिल हा 'एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग' विभागाचा बी.टेक. च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

आयआयटी मुंबईने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या विद्यार्थ्याने परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका 'चॅटजीपीटी' या एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या सात महिन्यांतील आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमधील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, तर जुलै २०२६ मध्ये नवीन सत्राच्या सुरुवातीला २० वर्षांच्या एका बी.टेक. दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले होते.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, साहिलच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या वसतिगृहातील मित्रांनी प्रशासनाला कळवले. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या घटनेनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, साहिलच्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

या घटनेमुळे त्याच्या शैक्षणिक करिअरवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असे आश्वासन त्याला देण्यात आले होते, असे आयआयटी प्रशासनाने त्याला सांगितले होते. त्यानंतर तो आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला, जेथे संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमागील सर्व परिस्थितीची सखोल चौकशी केली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणी एक प्रोफेसर तसेच अधिकारी यांच्याविरुद्ध अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शनिवारी उशिरा दाखल झाली असून हा तपास सीआयडी करणार आहे.

प्रशासनाचा खुलासा

शुक्रवारी उशिरा आयआयटी प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्याला शुक्रवारी सकाळी परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना पकडण्यात आले होते. परंतु, त्याच्यावर कोणतीही अनुशासनात्मक किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नव्हती. संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी संवाद साधून त्याचे समुपदेशन केले होते.

देशभरात ७४ मृत्यू

पवई आयआयटीत तीन विद्यार्थ्यांचा २०२६ मध्ये मृत्यू झाला असून, सप्टेंबर २०२१पासून संस्थेत नोंदवलेल्या आत्महत्या आणि अनैसर्गिक मृत्यूंच्या सहा घटनांपैकी निम्म्या घटना याच वर्षातील आहेत. तर, सप्टेंबर २०२१ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील आयआयटी कॅम्पसमध्ये ७४ आत्महत्या आणि अनैसर्गिक मृत्यू नोंदवले गेले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम

Thane Ganeshotsav 2026 : 'प्रसादा'साठी व्यावसायिक गॅस सिलिंडर अनिवार्य

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

Maharashtra TET Paper Leak : ८,००० रुपयांसाठी बुटांमध्ये लपवून चोरल्या प्रश्नपत्रिका

मंत्र्यांना पाहणीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश; दुष्काळावर इलाजाची तयारी सुरू