मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच मोनोरेल व उड्डाणपुलांवर खांब बेकायदा बॅनर, पोस्टर आणि स्टिकर्सने विद्रूप करणाऱ्यांविरोधात आता पालिका कठोर कारवाई करणार आहे. केवळ बॅनर-पोस्टर लावणाऱ्यांवरच नव्हे, तर सार्वजनिक मालमत्तेवर स्टिकर चिकटवून विद्रूपीकरण करणाऱ्यांवरही मोठा दंड आकारला जाईल, असा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला. या विषयी आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
मुंबईत सण-उत्सवांच्या काळात बेकायदा बॅनर-पोस्टरचा अक्षरशः सुळसुळाट होतो. सध्या गणेशोत्सव सुरू असताना शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बॅनर, पोस्टर आणि जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान होत आहे. या बेकायदा जाहिरातींवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या परवाना विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॅनर-पोस्टरविरोधात आतापर्यंत किती कारवाई करण्यात आली, याबाबत माहिती विचारली असता परवाना विभागाचे अधिकारी अनिल काटे यांनी २५ सप्टेंबरनंतर, म्हणजेच गणेशोत्सवानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
महापालिका आयुक्तांना पत्र देणार
बेकायदा बॅनर-पोस्टरचा प्रश्न महापालिकेच्या निदर्शनास आहे. मोनोरेलचे पिलर तसेच उड्डाणपुलांच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात स्टिकर्स चिकटविले जातात. हे स्टिकर्स सहज निघत नसल्याने सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होते. त्यामुळे स्टिकरवर ज्याचा फोटो अथवा जाहिरात आहे, त्याच्यावर मोठा दंड आकारण्याची तरतूद करण्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे.