उरण : मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) यांच्यातील जलवाहतुकीला आधुनिक गती देण्यासाठी ई-स्पीड बोट सेवेच्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. सध्या दीड तासांच्या आसपास असलेला हा प्रवास ई-स्पीड बोटमुळे फक्त ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण होणार असून प्रवाशांसाठी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या सेवेने बंदर व आसपासच्या परिसरातील प्रवास सुलभ आणि वेगवान होणार आहे.
मागील काही काळात पारंपरिक लाकडी बोटींच्या देखभाल खर्चासह परवाना शुल्कात वाढ झाल्याने आणि अलीकडील अपघातांच्या पार्श्वभूमीवर ई-स्पीड बोटी हा सुरक्षित व परवडणारा पर्याय ठरू शकतो, असे जेएनपीएचे मत आहे.
इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या य बोटी अत्याधुनिक तंत्रज्ञान, वातानुकूलित सुविधा आणि उच्च सुरक्षेसह सुसज्ज आहेत.
सेवा सुरू करण्यासाठी माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड (MDL) यांना बोट पुरवठा व हाताळणीची जबाबदारी देण्यात आली असून दहा वर्षांसाठी अंदाजे ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार ९९० रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
जलद-आरामदायी सागरी प्रवासाचा पर्याय
ई-स्पीड बोट सेवा सुरू झाल्यानंतर जेएनपीएतील कामगार, कस्टम विभाग, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्स व इतर प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी सागरी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर लवकरच अधिकृत वेळापत्रक आणि तिकीट दर जाहीर होण्याची शक्यता आहे.
ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाईल. सुरुवातीला ही सेवा फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र तांत्रिक सुधारणा, चार्जिंग क्षमता वाढविणे आणि कार्यक्षमतेत सुधारणा आवश्यक असल्यामुळे प्रकल्पात विलंब झाला.- कॅप्टन बाळासाहेब पवार, उपसंरक्षक (जेएनपीए)