मुंबई : मलबार हिल येथील ऐतिहासिक कमला नेहरू उद्यानातून जाणारा सिरी रोडचे रुंदीकरण करून हलक्या चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या २३ ऑक्टोबरला मुंबई महापालिकेच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उद्यानातील २,५४० चौरस मीटर हरित क्षेत्र बाधित होण्यासह झाडांची कत्तल, पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांना धोका आणि उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त केली.
चिरंजीवीलाल लोयालका मार्ग म्हणून नोंद असलेल्या आणि सिरी रोड या नावाने परिचित असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कमला नेहरू उद्यान व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेल्या जमिनीचा वापर करण्याची परवानगी या प्रस्तावाद्वारे मागण्यात आली आहे. बी. जी. खेर मार्गावरील कमला नेहरू उद्यानापासून तांबे चौकापर्यंतचा सुमारे ५३५ मीटर लांबीचा रस्ता हलक्या चारचाकी वाहनांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी उद्यान व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेली सुमारे २,५४०.५५ चौरस मीटर जागा वापरावी लागणार आहे. रस्त्याच्या काही भागाची रुंदी सध्याच्या सुमारे १४ फुटांवरून २५ फुटांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. या कामामुळे एकूण ७२ झाडे बाधित होण्याची शक्यता असून त्यापैकी ४८ झाडे तोडावी लागतील, तर २४ झाडांचे पुनर्रोपण करावे लागेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पाडावा लागण्याची शक्यता आहे. तांबे चौक परिसरातील काही दुकानांनाही याचा फटका बसू शकतो, असे प्रस्तावात नमूद केले आहे.
‘परिसराचे संरक्षण करा’
स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी चिपको आंदोलनाच्या धर्तीवर झालेल्या विरोधामुळे सिरी रोडचा प्रकल्प थांबविण्यात आला होता. त्यानंतर या परिसरात नागरिकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी निसर्गवाट विकसित करण्यात आली. आता पुन्हा रस्ता बांधण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत आहे.
२०१५ मध्ये सुधार समितीचा विरोध
२९ डिसेंबर २०१५ रोजी महापालिकेच्या सुधार समितीने हा प्रस्ताव बाजूला ठेवण्याची शिफारस केली होती. कमला नेहरू उद्यानाचे ऐतिहासिक महत्त्व, परिसरात वाहतूककोंडीची ठोस गरज नसणे, झाडांवर होणारा परिणाम आणि दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना संभाव्य धोका, ही कारणे त्यावेळी पुढे करण्यात आली होती. या जागेचे भूगर्भीय सर्वेक्षण करण्याची मागणी सुधार समितीने केली होती तर दुसरीकडे, रस्त्याचे रुंदीकरण केल्यास वाळकेश्वर रोड, तीन बत्ती आणि बी. जी. खेर रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल, प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल, असा दावा महापालिकेच्या मूळ प्रस्तावात करण्यात आला होता. मात्र, या दाव्याच्या तुलनेत पर्यावरणीय परिणाम आणि सार्वजनिक हिताचा समतोल कसा साधला जाणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.