Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात 
मुंबई

Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात

मुंबईतील कुर्ला फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीला टोळक्याने काठ्या-दगडांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांनी ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

Mayuri Gawade

मुंबई : मुंबईतील एका उद्यानात फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरुण-तरुणीला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात हा प्रकार घडला. तरुणीबद्दल अश्लील टिप्पणी केल्याने दोघांनी विरोध केला. मात्र, त्यानंतर मुलांच्या टोळक्याने त्यांना घेरून लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

फोटो काढताना तरुणीची छेड काढली

समोर आलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी कुर्ला पश्चिमेतील प्रमोद महाजन उद्यानात फोटो काढत होते. त्यावेळी सुमारे ८ ते १० मुलांचं टोळकं त्यांच्याजवळ आलं. या मुलांनी तरुणीबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप आहे. तरुण-तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं.

काठ्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण; VIDEO व्हायरल

पीटीआयच्या वृत्तानुसार, शुक्रवारी (२० नोव्हेंबर) या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलांचं टोळकं तरुण-तरुणीला घेरताना दिसत आहे. त्यानंतर काही मुलं तरुणाला काठीने मारहाण करतात, तर काही जण त्याला ठोसे आणि लाथा मारताना दिसतात.

यावेळी तरुणी आपल्या सोबतच्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते. दोघेही त्या ठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुलांचं टोळकं त्यांचा पाठलाग करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. एका मुलाने मोठा दगड उचलून त्यांच्या दिशेने फेकल्याचंही समोर आलेल्या दृश्यांमध्ये दिसत आहे.या मारहाणीत दोघांना नेमक्या किती दुखापती झाल्या, याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

८ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

माहितीनुसार, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. व्हिडीओच्या आधारे मारहाणीत सहभागी असलेल्या मुलांची ओळख पटवण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), ११८(१), ३५२, ३५१(२) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदेशीर जमाव, धोकादायक वस्तूने दुखापत करणं, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणं आणि धमकी देणं अशा आरोपांचा समावेश आहे.

पोलिसांनी आतापर्यंत ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक उद्यानात भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक बालकाला २२ नोव्हेंबरला पोलिओचे डोस; मुंबईत रविवारी पल्स पोलिओ मोहीम; २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण

एनसीईआरटीतून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; वंशजांची जनहित याचिका दाखल

Mumbai : पेप्सी उद्यानात छत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा; पालिका सभागृहाची मंजुरी

Mumbai : कामांच्या प्रस्तावांवरून गदारोळ; पारदर्शकतेचा अभाव, कंत्राटदारांना अभय; स्थायी समिती अध्यक्षांच्या पत्राकडे कानाडोळा

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद