मुंबई : भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बांधकाम, इमारत परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या एआय आधारित प्रणालीमुळे गृहनिर्माण व पुनर्विकास प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने होणार आहे. तसेच वास्तुविशारद, विकासक व संबंधित व्यावसायिकांना प्रस्तावातील त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे, नियमभंग किंवा आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे यांची माहिती सुरुवातीलाच मिळणार आहे. परिणामी मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिली एआय आधारित प्रणाली मुंबईत कार्यान्वित करण्यात आली आहे.
मुंबईतील नागरी प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हस्तांतरणीय विकास हक्क व्यवहारांसाठी भारतातील पहिली ‘ई-टीडीआर’ प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर आता महापालिकेकडून ‘सिव्हिटट्विन’ ही भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बांधकाम/इमारत परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित ‘मुंबई टेक् वीक २०२६’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.
‘मुंबई टेक् वीक २०२६’मध्ये ग्रामीण भागासाठी ‘महा-विस्तार’ या शेतकऱ्यांसाठी समर्पित आणि मुंबईसाठी ‘सिव्हिटट्विन’ ही भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बांधकाम/ इमारत परवानगी प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र जगात एआयचे नेतृत्व करेल - फडणवीस
महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
तसेच महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगार निर्मिती, सहा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.