मुंबई

Mumbai Local : मध्य रेल्वेवर महिन्यातून ४५० वेळा सरकते जिने बंद पडण्याच्या घटना

देवांग भागवत

मध्य रेल्वेवर (Mumbai Local) सरकते जिने उभारण्यात आले आहेत. एका बाजूला रेल्वे प्रशासन सोईस्कर सुविधा देत असताना दुसऱ्या बाजूला काही प्रवाशांकडून अनावधानाने अथवा मुद्दाम ''आपत्कालीन स्टॉप'' बटण दाबण्याचा घटना प्रतिदिन घडत आहेत. गर्दीच्या दादर, वडाळा, कल्याण, ठाणे या स्थानकात मागील काही दिवसात अशाप्रकारच्या घटना वारंवार उघडकीस आल्या असून यासंदर्भात प्रतिदिन १५ ते २० तक्रारी येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने आणि उद्वाहक बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यापैकी मध्य रेल्वे मुंबई विभागात २० आणि पश्चिम रेल्वेवर मार्च २०२३ पर्यंत १० सरकत्या जिन्या बसविण्याचे नियोजन आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना फलाटावरून पुलावर आणि पुलांवरून फलाटावर येणे सुलभ व्हावे यासाठी रेल्वे मंत्रालयाने सरकते जिने बसवण्याच्या निर्णय घेतला. सरकते जिने हे प्रवासी सुविधा म्हणून स्थानकात आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बहुतांश स्थानकात सरकते जिने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी वारंवार दुरुस्ती करूनही जिने बंद पडत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रतिदिन १५ ते २० तक्रारी प्राप्त होत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाढत्या तक्रारींमुळे सरकते जिनेच गैरसोईचे मुख्य ठिकाण बनले आहे. सरकते जिने बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला प्रवाशांना पुलाच्या पायऱ्या चढताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सरकते जिने वारंवार का बंद पडत आहेत?

सरकते हे जिने वारंवार बंद पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवरून मध्य रेल्वेकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने बिघाडाची नेमकी कारणे शोधण्यास सुरुवात केली. तपासणीअंती मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी सरकत्या जिन्यांना घाबरत असल्याने स्टॉप बटण दाबत असल्याचे दिसून आले आहे. संबंधित जिन्यांचे मुख्य ऑपेरेशन तांत्रिक केंद्र हे जिन्यांपासून लांब असल्याने जिने बंद असल्याचा अलार्म होताच कर्मचारी त्याची शहनिशा करत त्या केंद्रात जाऊन स्विच चालू करतात. यामध्ये कमालीचा वेळ लागतो. गर्दीच्या स्थानकात यावेळी अनेक अडचणी उद्भवतात असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेवर सध्या असलेले सरकते जिने - १११

प्रस्तावित सरकते जिने - २०

सरकते जिने ही सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र प्रतिदिन सरकते जिने बंद असल्याच्या तक्रारी येतात. लवकरच अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याचबरोबर सरकत्या जिन्यांची देखभाल व निरीक्षणासाठी स्थानकातील सीसीटीव्हींचाही वापर करण्यात येत आहे.

- रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का

जालन्यात महायुतीत धुसफूस? रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकर यांच्यात अबोला

मला ठार मारायचा प्रयत्न केला - उदय सामंत