Mumbai : लोकलमध्ये मोबाईल गोंगाटाला ५ हजार दंड; रेल्वे प्रशासनाची कारवाईची तयारी; सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाचीही तरतूद 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : लोकलमध्ये मोबाईल गोंगाटाला ५ हजार दंड; रेल्वे प्रशासनाची कारवाईची तयारी; सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाचीही तरतूद

मुंबई लोकलमध्ये मोबाईलवर इअरफोनशिवाय मोठ्या आवाजात व्हिडीओ, रील्स किंवा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना आता पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. गर्दीच्या लोकलमधील ध्वनिप्रदूषण आणि सहप्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/ मुंबई

मुंबई लोकलमध्ये मोबाईलवर इअरफोनशिवाय मोठ्या आवाजात व्हिडीओ, रील्स किंवा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना आता पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. गर्दीच्या लोकलमधील ध्वनिप्रदूषण आणि सहप्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना इअरफोनशिवाय मोबाईलवर मोठ्या आवाजात ऑडिओ ऐकणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांना तो बंद करण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे परिसरातील उपद्रव आणि गैरवर्तनाशी संबंधित रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत प्रस्तावित कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला ही मोहीम लोकल गाड्यांमध्ये राबविण्यात येईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही तिचा विस्तार केला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “इअरफोनशिवाय मोबाईलवर व्हिडीओ किंवा रील्स पाहणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला अशा प्रवाशांना समज दिली जाईल. त्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास उपद्रव निर्माण केल्याबद्दल दंड आकारला जाईल.”

लोकलमधून प्रवास करताना मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडीओ पाहणे, गाणी ऐकण्याच्या प्रकारांबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. मोबाईल इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकलच्या डब्यांमध्ये हा प्रकार अधिक सामान्य झाला आहे.

अनेक प्रवाशांसाठी हा केवळ गैरसोयीचा विषय राहिलेला नाही. मोठ्या आवाजामुळे विश्रांती घेणाऱ्या, वाचन करणाऱ्या किंवा फोनवर बोलणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. त्यातून आधीच गर्दीने भरलेल्या डब्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही उद्भवतात.

उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख म्हणाले, ‘गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये ही समस्या जाणवते. प्रवासी मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडीओ पाहतात. त्यामुळे त्रास होतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना सहप्रवाशांच्या सोयीचा विचार करावा आणि सार्वजनिक जागेतील शिस्त पाळावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीच्या टप्प्यात थेट दंड आकारण्याऐवजी प्रवाशांना इअरफोन वापरण्यास किंवा मोबाईलचा आवाज कमी करण्यास सांगितले जाईल, असेही त्यांनी सूचित केले.

मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिकीट तपासणी कर्मचारी आपली नियमित कर्तव्ये पार पाडत राहतील. मात्र, प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास मोबाईलवर मोठ्या आवाजात ऑडिओ ऐकणाऱ्यांना ते समज देऊ शकतील. प्रस्तावित दंडाची तरतूद लक्षात घेता, अशा प्रकाराची पुनरावृत्ती करू नये, याबाबत प्रवाशांना प्रथम सूचना दिली जाईल.

रेल्वे बोर्डाने रेल्वे प्रशासनांना डब्यांमधील मोठ्या आवाजातील संभाषणे, दीर्घकाळ चालणारे फोन कॉल आणि त्रासदायक रिंगटोन यांबाबत जनजागृती केली होती.

आधी जनजागृती, नंतर कारवाई

प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर तसेच लोकल गाड्यांमध्ये उद्घोषणा करण्याचाही विचार सुरू आहे. नियमांची माहिती सर्व प्रवाशांना समजावी यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये संदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शिवसेनेचे आज दसरा मेळावे; दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

तीन नवीन धरणांचा प्रस्ताव; ठाण्यासह सहा शहरांची तहान भागविण्यासाठी नियोजन; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

निदर्शनांचा अधिकार; मात्र स्थानिकांना त्रास नको, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

काँग्रेसची विजयादशमी! 'गोकुळ' निवडणुकीत सतेज पाटलांनी दिला 'महायुती'ला धक्का

टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता