Mumbai : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; कोणत्या भागांवर परिणाम? वाचा सविस्तर 
मुंबई

Mumbai : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; कोणत्या भागांवर परिणाम? वाचा सविस्तर

या ब्लॉकमुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी, १९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून विविध मार्गांवर जम्बो आणि मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आले आहेत. आवश्यक देखभाल कामांसाठी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम रेल्वेवर ५ तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेकडून सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईनवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक ठेवण्यात आला आहे.

या काळात फास्ट लाईनवरील सर्व लोकल गाड्या स्लो लाईनवर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून, बोरिवली आणि अंधेरीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर लाईनमार्गे गोरेगावपर्यंत वळवण्यात येतील.

मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेकडून ठाणे ते डोंबिवलीदरम्यान अप आणि डाऊन लाईनवर १८ एप्रिल मध्यरात्रीपासून १९ एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

या कालावधीत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर गाड्यांचा थांबा राहणार नाही, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक

हार्बर लाईनवर वाशी ते पनवेल दरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील सेवा प्रभावित होणार असून, काही गाड्या रद्द किंवा उशिरा धावण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना सूचना

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, हे ब्लॉक रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहेत. मात्र, एकाच दिवशी विविध मार्गांवर ब्लॉक असल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, तसेच रेल्वे वेळापत्रकासाठी स्थानक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात २% वाढ मंजूर, ८व्या वेतन आयोगाची शक्यता

अदानींनी अंबानींना मागे टाकले; गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण; मॅरिटाइम फंडला केंद्र सरकारची मंजुरी

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द