मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ पासून ते दुपारी ०३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० पासून ते दुपारी ०४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.
ब्लॉक कालावधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ पासून ते दुपारी ०३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या मुलुंडपुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. सदर सेवा आपल्या गंतव्य स्थानावर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबाने पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी १०.५८ पासून ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबविल्या जातील आणि माटुंगा स्थानकापासून पुढे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. सदर सेवा गंतव्य स्थानावर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावरील वेळापत्रकात बदल
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० पासून ते दुपारी ०४.१० पर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत ठाणे - वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर १० तासांचा पॉवर ब्लॉक
पश्चिम रेल्वेमार्फत रविवारी नॉन-इंटरलॉकिंगची मुख्य कामे करण्यासाठी अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार- रविवार मध्यरात्री अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील अंधेरी ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. शनिवारी रात्री १२.०० पासून ते सकाळी १०.३० पर्यंत १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.