मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील हेरिटेज महापौर बंगल्यात अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन हेरिटेज महापौर बंगल्यात नेमका काय बदल केला, महापौर बंगल्याचे नूतनीकरण या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांच्यासह विरोधी पक्षाचे नगरसेवक लवकरच महापौर बंगल्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. महापौर रितू तावडे यांना पूर्वकल्पना देण्यासाठी पत्रही पाठविण्यात येणार असल्याचे विरोधकांनी सांगितले.
महापौर बंगला ही लाकडी संरचनेची, कौलारू आणि हेरिटेज दर्जा असलेली एकमजली वास्तू आहे. प्रशासकीय काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही भागात वाळवी लागणे, लाकडी फर्निचरची दुरवस्था होणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी बंगल्याची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पाहणी करून अंतर्गत दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या सूचना दिल्यानंतर पुन्हा व्यापक नूतनीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली.
२ कोटी ९४ लाखांचा खर्च महापालिकेने मार्च महिन्यात यासाठी निविदा काढून एका कंपनीची नियुक्ती केली. वस्तू व सेवा करासह या कामांवर सुमारे २ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात आले. या अंतर्गत तळमजल्यावरील फरशीसाठी इटालियन मार्बलचा वापर, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकघर, अंतर्गत फर्निचरची दुरुस्ती, सर्व शौचालयांचे नूतनीकरण, अतिरिक्त शयनकक्ष व शौचालयांची उभारणी तसेच सभागृहाचे बैठकीच्या खोलीत रूपांतर अशा विविध कामांचा समावेश होता.
खर्चाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह
हेरिटेज असलेल्या महापौर बंगल्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च नेमका कोणत्या कामांसाठी झाला तसेच हेरिटेज वास्तूमध्ये करण्यात आलेल्या बदलांचे स्वरूप काय आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे हेरिटेज वास्तू असलेल्या महापौर बंगल्याची रितसर पत्र देऊन पाहणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावर मोठा खर्च झाला आहे. विरोधी पक्षांनी पाहणीचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे नगरसेवकही या दौऱ्यात सहभागी होतील, असे काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी सांगितले.
खर्चाचा तपशील जाणून घेणार
महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरील खर्चाबाबत आधीपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना महापौर कार्यालयाच्या समाजमाध्यम व्यवस्थापनासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सुमारे २५ लाख रुपयांच्या खर्चावरूनही वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आता प्रत्यक्ष पाहणी करून खर्चाचा तपशील जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.