मुंबईच्या महापौर रितू तावडेंना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांचा तपास सुरू 
मुंबई

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांचा तपास सुरू

कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह स्थानिक पोलिसांनी BMC मुख्यालयात सखोल तपासणी मोहीम राबवली.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बहल्ल्याची धमकी देणारा ई-मेल आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयात एकच खळबळ उडाली. ई-मेलमध्ये महापौरांच्या अधिकृत वाहनासह कार्यालयीन दालन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ई-मेलमध्ये स्फोटकांच्या सहाय्याने महापौरांची कार आणि कार्यालयीन कक्षाला उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ई-मेल मिळताच पोलिसांना माहिती देऊन तातडीने उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

BMC मुख्यालयात कसून तपासणी

कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह स्थानिक पोलिसांनी BMC मुख्यालयात सखोल तपासणी मोहीम राबवली. महापालिका मुख्यालयातील विविध विभाग आणि परिसरांची तपासणी करण्यात आली. तसेच संपूर्ण इमारतीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू

धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासाठी सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही."

महापौर आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे महानगरपालिकेलाही धमकीचा ई-मेल

मुंबईप्रमाणेच पुणे महानगरपालिकेलाही बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये मुख्य इमारत आणि महापौर कार्यालय उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला होता.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या ई-मेलमध्ये केवळ पुणे महापालिकाच नव्हे, तर नागपूरमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाचाही उल्लेख आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून पोलिसांकडून सर्व स्तरांवर तपास आणि खबरदारीची पावले उचलली जात आहेत.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली