मुंबई

मुंबई मेट्रो-३ मार्गाची आज चाचणी होणार

सकाळी ११ वाजता एका सोहळ्यात चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्यांनी दिली

वृत्तसंस्था

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मेट्रो-३ मार्गाची चाचणी मंगळवार (दि. ३० आॅगस्ट) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता एका सोहळ्यात चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्यांनी दिली.

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३’चे काम २०२१मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती; मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. आता ‘मेट्रो-३’चा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. हा संपूर्ण मार्ग ३३.५ किलोमीटरचा असला तरी सारीपूत नगर ते मरोळ नाका स्थानक अशी तीन किमीपर्यंतच पहिली चाचणी होणार आहे. त्यानंतर तीन ते सहा महिने चाचणी सुरूच राहील. ट्रेनचा वेग, हेलकावे घेण्याची स्थिती तसेच आपत्कालीन ब्रेक दाबल्यानंतर काय होते, याचीही चाचणी घेण्यात येणार आहे. एकूण १० हजार किमीपर्यंतची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढे सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. रखडलेली सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. ‘मेट्रो-३’ प्रकल्पातील कारशेडच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. तसेच श्रीसिटी येथून आणलेल्या पहिल्या मेट्रो गाडीची मुंबईत जोडणी करण्यात आली आहे. एमएमआरसीने मेट्रोच्या चाचणीची सर्व तयारी केली असून, या चाचणीला मंगळवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. सारीपूत नगर येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारशेडमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता ‘मेट्रो ३’च्या चाचणीस सुरुवात करण्यात येईल, असे एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी

विहिंपच्या भूमिकेवरून वाद; राजकारण तापण्याची शक्यता

GST कपातीचा फायदा; रेलनीर, अमूलच्या किंमतीत घट

अमेरिकेचे व्हिसास्त्र! भारतीयांच्या 'अमेरिकन ड्रीम'ला ट्रम्प यांचा सुरुंग; नव्या H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये शुल्क आकारणार

आदिवासींच्या नापीक जमिनी खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देता येणार; राज्य सरकार स्वतंत्र कायदा करणार - बावनकुळे