मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण 
मुंबई

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मेट्रो लाइन '७ ए' प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या मार्गावरील २४०० मिमी व्यासाच्या अपर वैतरणा पाणीपुरवठा जलवाहिनीचे वळवण्याचे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे.

Swapnil S

स्वीटी भागवत / मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मेट्रो लाइन '७ ए' प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या मार्गावरील २४०० मिमी व्यासाच्या अपर वैतरणा पाणीपुरवठा जलवाहिनीचे वळवण्याचे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे.

एमएमआरडीएने शनिवारी सांगितले की, ही गुंतागुंतीची जलवाहिनी वळवण्याची प्रक्रिया अत्यंत बारकाईने नियोजन करून आणि अचूक अभियांत्रिकी कौशल्याच्या माध्यमातून पार पाडण्यात आली. या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या नियोजन विभाग, बाह्य शहर (ट्रंक मेन्स), जलअभियंता कार्यालय तसेच के पूर्व विभाग यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधण्यात आला. ठरवून दिलेल्या मर्यादित कालावधीतील शटडाऊनमध्ये हे काम पूर्ण करण्यात आले आणि वेळेत पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या कामामुळे मेट्रो कॉरिडॉरचे काम वेळेत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही युटिलिटी डायव्हर्जन प्रक्रिया मेट्रो लाइन '७ ए' साठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. या मार्गावरील अंधेरी (पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या भुयारी विभागात गेल्या वर्षी जुलैमध्ये अंतिम बोगदा ब्रेकथ्रू साध्य करण्यात आला होता. हा बोगदा 'ध्रुव' नावाच्या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) खोदण्यात आला असून उत्खनन ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाले होते.

अपलाइन बोगद्याची लांबी सुमारे १.६५ किमी आहे. यापूर्वी, एप्रिल २०२५ मध्ये 'दिशा' या टीबीएमने या कॉरिडॉरवरील पहिला बोगदा ब्रेकथ्रू पूर्ण केला होता.

या कॉरिडॉरवर दोन स्थानके असतील. विमानतळ कॉलनी येथे एक उन्नत स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक भुयारी स्थानक. हे भुयारी स्थानक टर्मिनल टी-२ आणि मेट्रो लाइन-३ च्या विमानतळ स्थानकाच्या समांतर असेल. सहार एलिव्हेटेड रोडवरील वाहनांसाठीच्या अंडरपासच्या आधी, विलेपार्ले (पूर्व) येथे हा मार्ग भुयारी होतो.

या मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून जमीन हस्तांतरित करण्यात आली. बामणवाडा आणि वाल्मिकी नगर येथील सुमारे २०० झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यात आले, तसेच अनेक महत्त्वाच्या विविध यंत्रणांच्या पाईपलाइन्स वळवण्यात आल्या. यात १८०० मिमी व्यासाच्या सांडपाणी वाहिनीचे मायक्रो-टनेलिंगद्वारे पुनर्संरेखन करून जानेवारी २०२३ मध्ये ती कार्यान्वित करणेही समाविष्ट होते. मेट्रो लाइन '७ ए' हा एमएमआरडीएच्या मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रो व्यापक जाळे उभारण्याच्या योजनेचा भाग आहे.

सध्या मेट्रो लाइन १, २ ए आणि ७ कार्यरत आहेत, तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शहराची पहिली भुयारी मेट्रो लाइन ३ (आरे ते कुलाबा कफ परेड) सुरू केली आहे.

मेट्रो '७ ए'ची वाढीव जोड

मेट्रो लाइन '७ए' ही सध्या कार्यरत असलेल्या रेड लाइन (मेट्रो लाइन ७) ची ३.४ किमी लांबीची वाढीव जोड आहे. ही लाइन अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) दरम्यान धावते. या विस्तारामुळे अंधेरी (पूर्व) थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार असून पूर्व-पश्चिम दळणवळणात लक्षणीय सुधारणा होणार आहे. हा मार्ग काही प्रमाणात उन्नत (एलिव्हेटेड) तर काही भाग भुयारी असून वेस्टर्न एक्सप्रेस महामार्ग आणि सहार एलिव्हेटेड रोडच्या समांतर जातो.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल

छगन भुजबळांना क्लीनचिट : उच्च न्यायालयात दाद मागणार; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा इशारा