मुंबई

मुंबईकरांचा मेट्रो आणि बसचा प्रवास होणार सुलभ; फक्त एक 'कार्ड' वापरा आणि 'रांग' विसरा!

मुंबईत आता रेल्वे आणि बस प्रवासासाठी सुट्टे पैसे आणि कागदी तिकिटांची कटकट संपणार आहे. डिजिटल युगात, आता फक्त एका ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) च्या मदतीने मुंबईचा प्रवास सुलभ होणार आहे. मुंबईतील मेट्रो ३ साठी प्रवाशांचा वेळ वाचावा तसेच प्रवास सुलभ आणि सोयीचा व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) हे सामायिक कार्ड आणले आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईत आता रेल्वे आणि बस प्रवासासाठी सुट्टे पैसे आणि कागदी तिकिटांची कटकट संपणार आहे. डिजिटल युगात, आता फक्त एका ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) च्या मदतीने मुंबईचा प्रवास सुलभ होणार आहे. मुंबईतील मेट्रो ३ साठी प्रवाशांचा वेळ वाचावा तसेच प्रवास सुलभ आणि सोयीचा व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) हे सामायिक कार्ड आणले आहे. या कार्डचे मंगळवारी (१० जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात अनावरण करण्यात आले. हे कार्ड आजपासून (बुधवारी, ११ जून) आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) ते आचार्य अत्रे चौक या दरम्यानच्या मेट्रो लाईन ३ च्या स्थानकांवर कार्यान्वित झाले आहे. हे केवळ मेट्रोच नव्हे तर बससाठी देखील उपलब्ध झाले आहे.

'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' हे रुपे कार्ड असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या सहकार्याने निर्माण करण्यात आले आहे.

कार्डचे फायदे -

१. या स्मार्ट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांना मेट्रोच्या तिकीटासाठी आता रांग लावण्याची गरज नाही.

२. विशेष बाब म्हणजे हे कार्ड केवळ लाईन ३ पुरतेच मर्यादित नसून, मेट्रो लाईन १, २A आणि ७ साठी उपलब्ध आहे.

३. तसेच फक्त मेट्रोच नव्हे तर ‘चलो’ बससाठी देखील हे कार्ड वापरण्यात येणार आहे.

४. त्यामुळे प्रवाशांना एका कार्डद्वारे संपूर्ण मुंबईत सहज प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.

NCMC कार्ड कुठे मिळेल?

प्रवाशांना हे कार्ड कोणत्याही मेट्रो लाईन ३ स्थानकांवरील काउंटरवर किंवा सहभागी एसबीआय शाखांमध्ये मोफत मिळू शकते.

कसे वापरता येईल?

१. तिकीट काढण्यासाठी कोणत्याही रांगेत उभं राहण्याची गरज नसून मेट्रो लाईन ३ च्या प्रवेश आणि निर्गमन गेटवर फक्त तुमचे कार्ड टॅप करा.

२. हे कार्ड खरेदी करताना कोणतेही चार्जेस नाहीत. कार्ड खरेदी केल्यावर वापरण्यासाठी १०० रुपयांचा किमान रिचार्ज आवश्यक आहे. कार्डची कमाल टॉप-अप मर्यादा २००० आहे.

३. कार्ड ऑनलाइन, बँक अॅप्स किंवा मेट्रो स्टेशनवर सहज रिचार्ज करता येते.

MMRC च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “हे केवळ एक कार्ड नाही, तर मुंबईच्या स्मार्ट आणि प्रवाशांना अनुकूल वाहतूक व्यवस्थेतील गतिशील पाऊल आहे.”

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव