मुंबई : गेल्या २५ वर्षांत आम्ही आपली मुंबई आपुलकीने घडवली, प्रेमाने जपली असल्याने कितीही वादळवारे आली तरी मुंबईकर कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वास शिवसेनेच्या ‘पॉकेट बुक’मधून जागविण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचे मुंबई मॉडेल यशस्वी कसे झाले? याच प्रश्नाचे उत्तर या पॉकेट बुकमधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कोविडविरोधातील महायुद्धात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ आयएएस अधिकारी इक्बाल सिंह चहल यांची ८ मे २०२० रोजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पुढची साधारण दोन वर्षं राज्य शासनातील तसंच पालिका प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावत, प्रसंगी प्राणाची बाजी लावत, कोविडचा पराभव केला. याबाबतचं दस्तावेजीकरण मिन्हाज मर्चट यांनी ‘इक्बाल सिंह चहल: कोविड वॉरियर’ या इंग्रजी पुस्तकात (२०२२) केलं आहे. ‘मुंबई मॉडेल’ ही पुस्तिका मूलत: याच इंग्रजी पुस्तकातील (साभार : मंजुल पब्लिशिंग हाऊस) वर्णनं, माहिती, आकडेवारी आणि तथ्यांवर आधारित आहे.
कोविड महायुद्धात जनतेच्या मनातील भीतीला धैर्यात रूपांतरित करणारे मुंबई मॉडेल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशस्वी करून दाखविले. या मॉडेलमुळे ‘कोविड’सारख्या घातक रोगावर मात करण्याचा विश्वास नागरिकांमध्ये जागविला गेलाच नाही, तर तात्पुरत्या उभारलेल्या कोविड सेंटर्सनी रुग्णांना नवसंजीवनी मिळाली.
शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या ‘सॅफ्रॉन ॲण्ड ब्लॅक मुंबई’ या ‘पॉकेट बुक’मधून ठाकरी तेजपर्व अन् काळ्या गद्दारयुगाची तुलना’ करण्यात आली आहे. ही पुस्तिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना सविनय अर्पण करण्यात आली आहेत. या पुस्तिकेत मुंबई महापालिकेचे काटेकोर अर्थनियोजन, जगातील सर्वाधिक स्वस्त व बेस्ट बससेवा, मुंबई पब्लिक स्कूलचा यशस्वी प्रयोग, जगातील सर्वाधिक स्वस्त व मस्त आरोग्यसेवा, पिण्याचे शुद्धपाणी अत्यल्प दरात उपलब्ध करणारी मुंबई महापालिका, जगाने दखल घेतलेले मुंबईचे कोविड व्यवस्थापन, निसर्गस्नेही उद्यान, प्रशस्त मैदान व सुसज्ज नाट्यगृह, घनकचरा, सांडपाणी व आपत्ती व्यवस्थापन आणि २०२२ पासून मुंबईने अनुभवले गद्दारांचे अंधारयुग याविषयांना वाहिलेली आहे.
काळी बाजू
मुंबईसह महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकप्रिय होऊ लागल्याने ते थैलीशहांना बघवले नाही. या थैलीशहांनी फंदफितुरांना घेऊन २०२२ पासून मुंबईचा काळा अध्याय सुरू केला आहे. ९२ हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी मोडून त्यातील १० हजार कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात २.२५ हजार कोटीची आर्थिक तूट आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासू लागला आहे.
बेस्टचे भाडे दुप्पट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा वैज्ञानिक क्लब, वाघोबा क्लबही बंद केला आहे. मुंबईते रस्ते खड्डेमुक्त करण्याचे स्वप्नही अधुरेच राहिले आहे. ॲनाकोंडा व त्यांच्या हस्तकांनी मुंबईतील मोकळ्या जागा, मिठागरे बड्या उद्योगपतीच्या घशात घातली आहेत. मुंबईकरांवर कधी नव्हे तो कचरा कर लावला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार वाढला आहे, असे पुस्तिकेत म्हटले आहे.
दिवाळखोरीत गेलेली महापालिका सावरलीच नाही, तर मुंबई देशातील श्रीमंत महापालिका झाली
४० हजार कोटींचा अर्थसंकल्प व ९२ हजार कोटींच्या मुदतठेवींसह अर्थसंपन्न मुंबई महापालिका
५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर केला माफ
मुंबईकरांची बेस्ट आणि तिकीट दर होता फक्त रुपये ५
मुंबईच्या बेस्ट वीज वितरण प्रणालीचे जगात नाव
‘मुंबई पब्लिक स्कूल’चा यशस्वी प्रयोग!
१२३४ शाळांमध्ये ८ भाषिक माध्यमांमध्ये ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. २८ शालेय साहित्य मोफत दिले जात आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ६२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात आले आहे.
आरोग्यसेवा पुरविणारी महापालिका
दरवर्षी १ कोटी ४४ हजार रुग्णांवर माफक दरात वैद्यकीय उपचार करणारी आशियातील सर्वात मोठी महापालिका आहे. या महापालिकेची ४ वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालये आहेत. १ दंत महाविद्यालय आहे. २९ प्रसूतिगृहे आहेत. १६ उपनगरीय रुग्णालये आहेत. याशिवाय, ६ विशेष रुग्णालयांतून गरजू रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या १९० दवाखान्यांमध्ये २१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान ९० टक्के वैद्यकीय सेवा व १४० हून अधिक जीवनावश्यक औषधे पूर्णपणे मोफत दिली जात आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने केले कौतुक
कोविड काळात टीकेचा भडिमार सुरू होता. अफवांचा बाजार तेजीत सुरू होता. तथापि, उद्धव ठाकरे यांनी कोणताही राजकीय दबाव, सरकारी वैद्यकीय यंत्रणांवर येऊ दिला नाही. दहा लाख रुग्णांवर उपचार करणारे जम्बो कोविड सेंटर बीकेसीमध्ये उभारले. त्यासह ११ जम्बो सेंटर्स व १८४ रुग्णालये कोविडसाठी सज्ज करण्यात आली होती. याच कोविड व्यवस्थापनाच्या मुंबई मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेनेही जागतिकस्तरावर कौतुक केले होते.
कोस्टल रोड ठरला दूरदर्शीपणाची चुणूक
मुंबईतील कोस्टल रोड हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे फक्त स्वप्न नव्हे, तर एका कुशल राज्यकर्त्यांच्या दूरदर्शीपणाची चुणूक दाखविणारा प्रकल्प ठरला आहे. हा भारतातील पहिला व एकमेव सागरीकिनारा मार्ग ठरला आहे. या प्रकल्पाद्वारे नरिमन पॉइंट ते दहिसरपर्यंतचे अंतर केवळ २० मिनिटांमध्ये पार करण्याचे व्हीजन उद्धव ठाकरे यांचेच आहे. त्यांनी वरळी-शिवडी कनेक्टरचे काम सुरू केले. तसेच, अटल सेतूचा पहिला गर्डर जानेवारी २०२० मध्ये लॉन्च करून अल्पावधीत ८२ टक्के काम पूर्ण केले.
आदित्य ठाकरे यांची अफलातून संकल्पना
आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘नेचर वॉकवे’ प्रकल्प साकारण्यात आला, तोही दाट झाडीतून नेत अरबी समुद्राचे विहंगम दर्शन घडवितो. एवढेच नव्हे, तर त्यांनी जलनि:सारण प्रकल्पाचे रूपांतर सागरी सौंदर्य दर्शक मंचामध्ये केले. पेंग्विनना आणून भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाचा कायापालट घडविला. गोराईत देशातील पहिल्यावहिल्या कांदळवन उद्यानाची उभारणी केली.