Mumbai : उघड्या मॅनहोलने घेतला बळी; साकीनाक्यातील दुर्घटना, चार अधिकारी निलंबित 
मुंबई

Mumbai : उघड्या मॅनहोलने घेतला बळी; साकीनाक्यातील दुर्घटना, चार अधिकारी निलंबित

मुंबईत गुरुवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान, चांदिवली परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत गुरुवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान, चांदिवली परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘एल’ विभाग परिसरात कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत ही दुर्घटना घडली. कुर्ला पश्चिम व पूर्वेला एकूण ७५ मॅनहोल असून ४ मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. मात्र ते करताना कंत्राटदाराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नव्हती, असे स्पष्ट झाले. त्यावेळी रस्त्यावरून श्री. असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. श्री. शेख मॅनहोलजवळ आले त्यावेळी मॅनहोलजवळ कामासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने श्री. शेख यांचा तोल जाऊन ते 'मॅनहोल' मध्ये पडले. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल आणि कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तथापि, दुर्दैवाने शेख यांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली असून, ते चालताना अचानक अदृश्य झाल्याचे दिसत आहे. पडल्यानंतर काही काळ कामगारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह काही अंतरावर शोधून काढला. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, महापालिका वर्तुळात आणि सदर परिसरात उमटले. या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी, उप महापौर संजय घाडी यांनी आणि महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत भेट देऊन पाहणी केली. 

राजकीय पडसाद आणि संताप या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत:

संजय घाडी (उपमहापौर): या प्रकरणी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.

किशोरी पेडणेकर (शिवसेना-यूबीटी): व्यस्त रस्त्यावर कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता काम सुरू असणे ही मोठी चूक असून, त्यांनी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे.

मिलिंद देवरा (माजी खासदार): "हे अपघात नसून प्रशासकीय निष्काळजीपणाचे बळी आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत हलगर्जी सहन करता कामा नये.

या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे अर्थयहाय्य करण्याचे माननीय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले आहे.

असा लागला शोध!

नागरिकांनी आणि खासगी कर्मचाऱ्यांनी अस्लम शेख यांना शोधण्यासाठी मॅनहोलमध्ये शिडी उतरवली, परंतु त्यांना फक्त त्यांची छत्री आणि चपला सापडल्या. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शेख कोणत्या दिशेने वाहून गेले आहेत हे समजू शकले नाही. त्यामुळे तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी १०० फूट अंतरावरील झाकण उघडून एक्झॉस्ट ब्लॉवरचा वापर करून सीवर लाइनमधील हवा खेळती केली आणि ‘बीए सेट’ परिधान करून तसेच रेस्क्यू व्हॅनचे ट्रायपॉड व दोरीची शिडी वापरून सीवर लाइनमध्ये उतरून शोध सुरू केला. दरम्यान, काही अवधीतच मॅनहोलमधील पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने वाहत होता, त्या दिशेने पुढे शोध घेतल्यावर अस्लम शेख सापडले. त्यांना तत्काळ बाहेर काढून तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी अस्लम शेख यांना मृत घोषित केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इथेनॉल धोरणाबाबत नागरिकांचे प्रश्न

आजचे राशिभविष्य, ३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

जुलै महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

पावसाळ्यात फरशी पुसल्यानंतरही घरात येतोय कुबट वास? मग एकदा 'हा' उपाय करून पाहाच

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव