काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रभादेवी येथे शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या समर्थकांनी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. मात्र, आता यावर मुंबई पोलिसांनी एक अहवाल दिला असून, प्रभादेवी परिसरात सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचे म्हंटले आहे. तसेच, ती बंदूक जरी सदा सरवणकरांची असली तरी गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचा पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या या अहवालामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीदरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर हाणामारी झाली तसेच गोळीबारही करण्यात आल्याचे तक्रार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले. यानंतर आलेल्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले असल्याचे सिद्ध झाले. पण, आज पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात सदा सरवणकर यांनी गोळी झाडली नसल्याचे सांगितले आहे.