मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकबाबत सगळा खोटारडेपणा बाहेर आला आहे. महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक केली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत प्रत्युत्तर दिले. कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या घटनेने आपल्याला काही गोष्टी शिकवल्या. पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते हे लक्षात आले. यासंदर्भात आपण आयआयटी तज्ज्ञांशी चर्चा केली असून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने नवीन आराखडा दिला आहे. हा आरखडा राबवल्याने कदाचित पुढच्या वेळी अशी घटना घडणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सत्तारूढ पक्षाच्यावतीने नियम २९३ अन्वये विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंकवरून सरकारवर होणाऱ्या टीकेचा आज समाचार घेतला. ज्यावेळी कोकण रेल्वे मार्ग बांधायची वेळ आली, तेव्हाही इथे दरडी कोसळतात, ही रेल्वे चालणार नाही असे सांगितले गेले. पण मधु दंडवते या माणसात हिंमत होती म्हणून त्यांनी हा रेल्वेमार्ग बांधला. भीतीने कोकण रेल्वे केलीच नसती तर काय अवस्था झाली असती. कनेक्टिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. मागच्या आघाडी सरकारने या लिंकचा प्रस्ताव तयार केला आणि त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी १४ कारणे सांगून ही लिंक करता येणार नाही असे सांगत फाईल बंद केली, अशा शब्दात फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नाव न घेता लक्ष्य केले.
या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली. त्यामुळे तुम्ही मला शिव्या द्या, मला सवय आहे, मी शिव्या प्रूफ आहे. परंतु, आजपासून दहा वर्षांनी शिव्या देणारे नसतील. पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस, शिंदेंचे नाव असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करून नका. ज्यांना कुत्रे विचारत नाही, ते सोशल मिडियावर येऊन मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांना शिव्या देतात. असेच काही भाड्याचे टट्टू पैसे घेऊन कनेक्टिंग लिंकबाबत सोशल मिडियावर लिहित होते. त्यांना सांगतो, महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
काही लोक तर कुठून काय खाऊन येतात माहिती नाही. आमचे आंदोलन होते म्हणून नाशिकमध्ये पाऊस पडणार असे खोटे मी पसरवल्याचे ते म्हणाले. नानाभाऊ पटोले तुमच्या सारखी चांगली माणसे बाजूला झाली की काय होते हे यातून दिसून येते, अशा शब्दांत फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नाव न घेता टोला लगावला. ' मंजिल मिल ही जाएगी, भटकते हुवे ही सही, अरे गुमराह तो वो है, जो घर से निकले ही नहीं' या ओळींनी भाषणाचा शेवट करताना फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चिमटा कढण्याची संधी सोडली नाही.