धावत्या ट्रेनमधील दीड कोटींच्या चोरीचा लावला छडा; सहा महिन्यांच्या तपासानंतर रेल्वे पोलिसांना मोठे यश 
मुंबई

Mumbai : धावत्या ट्रेनमधील दीड कोटींच्या चोरीचा लावला छडा; सहा महिन्यांच्या तपासानंतर रेल्वे पोलिसांना मोठे यश

मुंबई रेल्वे गुन्हे शाखेने गेल्या वर्षअखेरीस मुंबईजवळ धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा छडा लावला असून १० सदस्यांच्या टोळीतील चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून १ कोटी ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई रेल्वे गुन्हे शाखेने गेल्या वर्षअखेरीस मुंबईजवळ धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा छडा लावला असून १० सदस्यांच्या टोळीतील चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून १ कोटी ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये लपलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, तांत्रिक पथके आणि दंगल नियंत्रण पथकांच्या मदतीने राज्यभर सहा महिने कसून तपास करण्यात आला. या प्रकरणातील उर्वरित सहा फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे छापे सुरू आहेत.

सोलापूर-मुंबई सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये ६ आणि ७ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री एका सराफा व्यापाऱ्याच्या बॅगेतून सोने आणि इतर मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता. मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे राहणारे ५२ वर्षीय सोने व्यापारी सोलापूरवरून कल्याणच्या दिशेने एसी डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्याकडे दोन ट्रॉली बॅग होत्या, मात्र ते झोपेत असताना अज्ञात चोरांनी सोन्याचे दागिने असलेली एक बॅग लांबवली.

या घटनेनंतर व्यापाऱ्याने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त एम राकेश कलासागर आणि पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी रेल्वे गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

चार जणांना अटक

वरिष्ठ निरीक्षक विजय खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिद्धेश्वर एक्स्प्रेस थांबणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरील आणि सोलापूरच्या सराफा बाजारातील शेकडो तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरुवातीला कोणताही फॉरेन्सिक पुरावा नसताना पोलिसांनी धूसर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १० संशयितांची ओळख पटवली. त्यांचे फोटो खबऱ्यांकडे पाठवून ही टोळी सोलापूरची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सोलापूरमधील बार्लोणी, कावहे आणि वडशिंगे गावांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून रमेश बाळू डिकोळे, फुलचंद गुंजाळ, धनराज गुंजाळ आणि पुणेकर डिकोळे या चौघांना अटक केली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग