मुंबईकर ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पावसाने सोमवारी (दि.२२) सकाळी दमदार पुनरागमन केले. गेल्या काही दिवसांपासून उकाडा, वाढलेली आर्द्रता आणि रखडलेल्या मान्सूनमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशातच मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाच्या सरींनी मुंबईसह उपनगरांना दिलासा दिला मिळाला आहे.
सोमवारी पहाटेपासूनच दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरे, ठाणे तसेच नवी मुंबईतील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचाही कडकडाट झाला. दादर, वांद्रे, गोरेगाव तसेच पूर्व द्रुतगती मार्ग परिसरात पावसाच्या सरींनी जोर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मान्सूनच्या अधिकृत आगमनाची प्रतीक्षा
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून आज उशिरा किंवा मंगळवारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र सर्व हवामानविषयक निकष पूर्ण झाल्यानंतरच मान्सून आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
साधारणपणे ७ किंवा ८ जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होतो. मात्र यंदा २० जून उलटल्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठा, पाणीपुरवठा आणि उशिरा येणाऱ्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
वांद्रे आणि वरळीत सर्वाधिक पाऊस
मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यमान नोंदीनुसार, सकाळी ६ ते ७ या वेळेत शहर विभागात सरासरी १७ मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये १० मिमी पावसाची नोंद झाली.
वरळी नाका येथील सावित्रीबाई फुले महापालिका शाळा परिसरात एका तासात तब्बल ६१ मिमी पाऊस पडला. जी/दक्षिण विभागात ५८ मिमी, आदर्श नगर शाळा (वरळी) आणि मलबार हिल येथे प्रत्येकी ४४ मिमी, तर वरळी फाउंटन परिसरात ४२ मिमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे परिसराने सर्वाधिक पाऊस अनुभवला. पाली-चिंबई शाळा आणि सुपारी टँक महापालिका शाळा परिसरात एका तासात प्रत्येकी ७० मिमी पाऊस पडला. एच/पश्चिम विभाग कार्यालयात ३० मिमी, वांद्रे अग्निशमन केंद्रात २८ मिमी, तर जुहू आणि इतर काही भागांत २५ मिमी पावसाची नोंद झाली.
ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने सकाळी ७ वाजता पुढील तीन तासांसाठी 'नाऊकास्ट' इशारा जारी करत मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी विशेषतः सखल भागात आणि मेघगर्जनेच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मान्सूनच्या वाटचालीला वेग
हवामान तज्ज्ञांच्या मते, २४ ते २८ जूनदरम्यान पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. गेल्या दोन आठवड्यांपासून रखडलेला मान्सून आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांकडे सरकत असून पुढील काही दिवसांत कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.