मनोज रामकृष्णन/ मुंबई : भक्तांच्या दानात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या प्रशासनावर लक्ष केंद्रित झाले असतानाच, नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी राखी चव्हाण यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
मंदिर ट्रस्टच्या कारभारासंदर्भात आरोपांचा सामना करावा लागलेल्या वीणा मोरे-पाटील यांच्या जागी शासनाने त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच, शासकीय विभागांमधून एका कार्यकारी सचिवांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता असून, इच्छुक अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दानाच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या प्रशासकीय व्यवस्थेत हा बदल झाला आहे.
मनसेने मंदिराच्या दानातून वर्षाला सुमारे १८ कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना मंदिरातील दान आणि खात्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
यापूर्वी मार्च महिन्यात चोरीची एक घटना घडली होती, ज्यामध्ये दानाच्या पेटीतून रोख रक्कम चोरल्याप्रकरणी दादर पोलिसांनी मंदिरातील एका कर्मचाऱ्याला अटक केली होती. पुजाऱ्यांच्या खोलीत ठेवलेल्या दानपेटीतून हा कर्मचारी नोटा काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. पोलिसांनी त्या घटनेतील रक्कम सुमारे १०,००० रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता आणि यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत होते.
दरम्यान, मंदिर परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण आणि पुनर्विकासाच्या कामासाठी १७ ऑगस्टपासून भक्तांसाठी 'सिद्धि' प्रवेशद्वार तात्पुरते बंद राहील, अशी माहिती मंदिर ट्रस्टने दिली आहे. या काळात भाविकांना दर्शनासाठी 'रिद्धि' प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांनी सांगितले.