मुंबई : रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांची काटेकोर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी मोटार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया खात्यांवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेच्या अनुषंगाने ॲपआधारित वाहतूक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या चालकांची पडताळणी, त्यांच्या कागदपत्रांची वैधता आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले. रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची पार्श्वभूमी, परवाने, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित नियमांचे पालन यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.
गरज पडल्यास कायद्यात सुधारणा
ॲॅपआधारित प्रवासी वाहतूक सेवांचा विस्तार होत असताना या क्षेत्रातील चालकांना लागू असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये आवश्यक तरतुदी अपुऱ्या ठरत असतील, तर चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सुधारित कायदा तयार करण्याच्या पर्यायाचाही गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.