मुंबईतील CSMT स्थानकावर मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. या संपाचा सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला. या दरम्यान सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ मोठा अपघात घडल्याचे समोर आले आहे. CSMT हून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने ४ जणांना धडक दिल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.६) संध्याकाळी घडली. यामध्ये २ महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हे चारही जण सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ रुळ ओलांडत होते. याचवेळी मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने या चौघांना उडवलं. धडक इतकी जोरदार होती की दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित दोघांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मृत महिलांची ओळख पटवण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका
९ जून २०२५ रोजी मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ९ जण जखमी झाले होते. या घटनेच्या चौकशीत रेल्वे अभियांत्रिकी विभागावर ट्रॅक देखभालीतील निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईचा निषेध म्हणून गुरुवारी संध्याकाळी CSMT रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक संप केला. जवळपास १ तास संप सुरू असल्याने ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर रेल्वे सुरू करण्यात आली. पण, याच दरम्यान हा अपघात झाला. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.