मुंबई : कांदिवलीतील एका सोसायटीच्या सभासदाच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह आणि बदनामी मजकूर देऊन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनोद वर्मा या सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध समतानगर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आर्थिक सल्लागार असलेले तक्रारदार हे कांदिवलीतील एका सोसायटीचे सभासद आहेत. त्यांच्या सोसासटीच्या कमिटीमध्ये दोन संचालक, एक अध्यक्ष, सेक्रेटरी विनोद वर्मा, खनिजदार आणि इतर सभासदांचा समावेश आहे. सोसायटीच्या कमिटीने रहिवाशांच्या समस्येसाठी एक अधिकृत ईमेल आयडी तयार केला आहे. या ईमेलवर रहिवाशी त्यांच्या तक्रारी देतात. या तक्रारीचे नंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून निरसन केले जाते. अनेकदा तक्रारदार स्वत: जातीने काम करत असल्याने विनोद वर्मा त्यांची अडवणूक करून त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते.
सोसायटीची मिटिंग असल्याने त्यांनी काही मुद्दे काढले होते. ते मुद्दे त्यांनी ईमेलवर पाठविले होते. या कारणावरून विनोद वर्माने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तसेच मेलवरच त्यांच्या पत्नीची बदनामी करणारा मजकूर पाठवल्यावर समतानगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.