मुंबई : मुंबईसह ठाणे आणि भिवंडीतील नागरिकांनी पुढील सात दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
पिसे-पांजरापूर संकुलातील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून हा कप्पा बुधवार, २८ ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच मुंबई महापालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महापालिका क्षेत्रातील काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. येवई जलाशयाचा संबंधित कप्पा कार्यान्वित करताना पाण्याच्या गुणवत्तेत संभाव्य बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सात दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे.
या विभागांवर होणार परिणाम!
मुंबई शहर विभागातील ए विभागाच्या नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसरात, तर भायखळा, सँडहर्स्ट रोड, परळ, माटुंगा विभागातील संपूर्ण परिसरात खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)