मुंबई

मुंबई, ठाणे, कडोंमपात महायुतीचाच महापौर! मनसेच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असून भाजप आणि शिंदेसेनेचा एकत्रित आकडा ११८ इतका आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या मदतीशिवाय भाजप सत्ता मिळवू शकत नाही, अशी स्थिती आहे.

Swapnil S

मुंबई : कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसेने शिंदेंसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे आता मुंबईतही मनसे आणि शिंदेसेना एकत्र येणार का, अशी उलटसुलट चर्चा सुरू झालेली असतानाच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता, जर आणि तर यावर बोलण्यापेक्षा आता काय आहे, त्यावर बोला, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला असून मुंबई, ठाण्यासह अनेक महापालिकांमधील महापौरपद आणि सत्तास्थापनेबाबत जुळवाजुळव सुरूच आहे. मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असून भाजप आणि शिंदेसेनेचा एकत्रित आकडा ११८ इतका आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या मदतीशिवाय भाजप सत्ता मिळवू शकत नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच शिंदेसेनेने महापौरपदाची मागणी केली व महापौरपद प्रथम अडीच वर्षांसाठी मिळावे, असा आग्रह धरला. पण यासंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

म्हणून मनसेचा महायुतीला पाठिंबा!

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला (शिंदे) पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे) भाजपला बाजूना ठेवून स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मनसेने कल्याण-डोंबिवलीमधील विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यापूर्वीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे आमच्याबरोबर (महायुती) होता. भाजप आणि शिवसेनेची (शिंदे) युती आजची नाही. या युतीत आता मनसेचाही सहभाग झाला आहे. आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन करणार आहोत’.

भाजप शिंदेंसोबत करणार सत्तास्थापनेचा दावा

मुंबईत बहुमताचा ११४ आकडा एकाही पक्षाला गाठता आलेला नाही. त्यामुळे शिंदेंना सोबत घेऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत महायुती आता बेरजेचे राजकारण करणार की कोणती नवी खेळी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, मुंबई महापालिकेत १९९७ ते २०२२ अशी २५ वर्षे शिवसेनेचा महापौर होता. त्यावेळी एकसंध शिवसेना आणि भाजपची युती असताना सेनेकडे महापौरपद आणि भाजपकडे उपमहापौरपद अशी सत्तापदांची वाटणी व्हायची. या कालावधीत शिवसेनेच्या जागा भाजपच्या जवळपास तिप्पट असायच्या. सेनेकडे जास्त संख्याबळ असल्याने त्यांनी महापौरपद कायम आपल्याकडे ठेवले होते. पण आता नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाचे गणित बदललेले दिसणार असून पहिल्यांदाच भाजपकडे महापौरपद जाईल आणि सेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार आहे.

शिंदेसेनेची मागणी भाजपने केली अमान्य

महापौरपद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप एकदम ठाम आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शुक्रवार २३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कालावधीत महापौरपद आपल्याकडे असावे, अशी शिंदेसेनेची इच्छा होती. त्यांनी यासंदर्भात मागणी करुनही पाहिली. पण भाजपने ही मागणी अमान्य केल्याचे समजते.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय