मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम; आज हलक्या सरी होण्याचा अंदाज छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम; आज हलक्या सरी होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी हजेरी लावली असून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिमझिम सरी कोसळल्या. दादर, माटुंगा, खार, चेंबूर, मानखुर्द, कुर्ला, सांताक्रूझ, विले पार्ले, अंधेरी आणि वर्सोवा या उपनगरांमध्ये लक्षणीय पाऊस झाला. काही भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी हजेरी लावली असून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिमझिम सरी कोसळल्या. दादर, माटुंगा, खार, चेंबूर, मानखुर्द, कुर्ला, सांताक्रूझ, विले पार्ले, अंधेरी आणि वर्सोवा या उपनगरांमध्ये लक्षणीय पाऊस झाला. काही भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या मुंबईकरांना अखेर मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या ते रिमझिम सरी कोसळत असल्याचे पाहायला मिळाले.

हवामानात अचानक झाला बदल

मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिक घामाच्या धारांमुळे कमालीचे हैराण झाले आहेत. सांताक्रूझ येथे २९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना रात्रीच्या वेळीही तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबईत असेच उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज असला, तरी काही भागांत अचानक हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. पाऊस आणि एका अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाशीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पावसापासून बचावासाठी कोणतेही साहित्य न घेतलेले अनेक दुचाकीस्वार अचानक आलेल्या मुसळधार पावसात उड्डाणपूल, स्कायवॉक आणि दुकानांच्या छताखाली आश्रय घेताना दिसले.

आज हलक्या सरी

मुंबईत सोमवारी हलक्या सरींची शक्यता कायम असून, मंगळवारी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागांत या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चेंबूरमध्ये सर्वाधिक

पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेत पूर्व उपनगरांमध्ये सरासरी ५ मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये २ मिमी आणि दक्षिण मुंबईत (आयलंड सिटी) ०.६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस चेंबूर येथील कलेक्टर्स कॉलनीमध्ये २७ मिमी नोंदवण्यात आला, त्यानंतर वैभवनगर आणि मानखुर्द अग्निशमन केंद्रात प्रत्येकी २२ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमध्ये, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) अग्निशमन केंद्रात सर्वाधिक २२ मिमी पाऊस झाला, त्यानंतर सांताक्रूझमध्ये १७ मिमी आणि गजधर बंध पंपिंग स्टेशनवर १२ मिमी पावसाची नोंद झाली.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा