मुंबई : शनिवार सकाळपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी कायम होता. मुंबईसह राज्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी अशा अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यान भूमिगत बोगद्यात गळती लागली होती, तर रेल्वे हद्दीत पाणी साचल्याने रेल्वे सेवाही उशिराने धावत होती.
मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. गोरेगाव आरे कॉलनीत दुचाकीस्वाराच्या अंगावर फांदी पडल्याने १८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. कुर्ला कमानी येथे दुकानदाराच्या अंगावर झाड पडल्याने युनूस कुडावाला यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याआधी चेंबूर येथे झाडाने विहानचा तर साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रविवारी चौथा बळी गेला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केले असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांना केले आहे.
सक्रिय मान्सून प्रणाली
सामान्यतः मुंबईत मान्सून काळात वाऱ्याचा वेग ताशी २० ते ३० किलोमीटर दरम्यान असतो. सक्रिय मान्सूनच्या काळात तो ३० ते ४० किलोमीटरपर्यंत वाढतो. मात्र, यावेळी सक्रिय मान्सून प्रणाली, किनारपट्टीलगतचा प्रभावी ऑफशोअर ट्रफ आणि वातावरणातील तीव्र दाब यातील फरक हे तिन्ही घटक एकाच वेळी सक्रिय झाल्याने वाऱ्याचा वेग ५० किलोमीटरपेक्षा अधिक वाढला आणि अनेक भागांत ७५ किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहत होते.
या ठिकाणी तुंबले पाणी
पूर्व उपनगरामध्ये साकिनाका, काजूपाडा, काळे मार्ग कुर्ला, अशोकनगर कुर्ला, छेडानगर जंक्शन चेंबूर, पवई, भांडुप, साकिनाका याठिकाणी तर पश्चिम उपनगरात अंधेरी, विले पार्ले, सांताक्रुझ, गोरेगाव पूर्व, दहिसर, दादर , भायखळा, वरळी, आदी ठिकाणी पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक विस्कळित झाली होती.
४२ बस मार्गांमध्ये बदल
रविवारी पावसाचा जोर कायम असल्याने चेंबूर ९० फिट रोड, दादर, भायखळा, वरळी, विद्याविहार, घाटकोपर, मालाड, अंधेरी, दादर टीटी अशा विविध ठिकाणी ४२ बस मार्गात बदल करण्यात आला.
अन्टॉप हिल येथे दरड कोसळली!
युनीट नं. ४, क्राईम ब्रांच ऑफीस समोर, गांधी नगर, अन्टॉप हिल परिसरात झाडे पडल्यामुळे टेकडीवरील मातीचा काही भाग घसरुन खाली आला आहे. या घटनेत जीवितहानी नाही.
घरे / भिंती पडणे
खान अब्दुल गफार खान रोड, वरळी डेअरी जवळ, वरळी येथे तळमजला अधिक तीन असे रिकामे असणारे बांधकाम कोसळले. जीवितहानी नाही.
शहरात ४, पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण १५ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. जीवितहानी नाही.
९४ टक्के सरासरी गाठली
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत २६५.६ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दशकातील जुलै महिन्यातील २४ तासांत पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये २२७.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. सांताक्रूझ वेधशाळेत याच कालावधीत २२७.७ मिमी पाऊस झाला असून, गेल्या पाच वर्षांतील जुलै महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाची ही २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद आहे. १ ते ५ जुलै या अवघ्या पाच दिवसांत कुलाबा येथे ६९५.४ मिमी पावसाची नोंद झाली असून हा जुलै महिन्याच्या सरासरी ७३४.१ मिमी पावसाच्या तब्बल ९४ टक्के आहे.
जोरदार वाऱ्यांचा तडाखा
मुसळधार पावसासह यंदाच्या मान्सूनने रविवारी मुंबईला जोरदार वाऱ्यांचाही तडाखा दिला. शहरातील अनेक भागांत वाऱ्याचा वेग ताशी ७५ ते ७७किलोमीटरपर्यंत पोहोचला. नेहमीच्या मान्सूनच्या तुलनेत हा वेग दुपटीहून अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटणे, फलक कोसळणे अशा घटनांमुळे नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र होते. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह आणि मलबार हिल परिसरात ताशी ७२.४ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली. पूर्व उपनगरातील घाटकोपर येथे वाऱ्याचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचला, तर पश्चिम उपनगरातील वांद्रे (पश्चिम) येथे सर्वाधिक ताशी ७७किलोमीटर वेगाचे वारे वाहत होते.
शाळा-कॉलेजांना सुट्टी
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.