मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला चार दिवस 'ऑरेंज अलर्ट'; IMD चा २, ३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा  X
मुंबई

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला चार दिवस 'ऑरेंज अलर्ट'; IMD चा २, ३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहे. मुंबईकरांना मध्यरात्रीनंतर त्याची प्रचिती  आली. रविवारच्या मध्यरात्री पूर्व उपनगरात अवघ्या तीन तासांत धुवांधार पाऊस बरसला. विशेषत: घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडबरोबरच अंधेरी सबवे, मालाड या परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर होता.

Swapnil S

मुंबई : हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहे. मुंबईकरांना मध्यरात्रीनंतर त्याची प्रचिती  आली. रविवारच्या मध्यरात्री पूर्व उपनगरात अवघ्या तीन तासांत धुवांधार पाऊस बरसला. विशेषत: घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडबरोबरच अंधेरी सबवे, मालाड या परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर होता. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले होते, तर ३४ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने    मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. त्यात २ व ३ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा दिला आहे.

जून महिन्यात अंदाजे ४०० मिमी पावसाची नोंद होते. यंदा सर्व जून जवळपास कोरडा गेला असताना अखेरीस मुंबई व परिसरात पावसाने विशेष करुन रात्रीच्या वेळी जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम सबवे काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. मात्र महापालिकेने पंपाद्वारे पाण्याचा निचरा केल्याने सकाळी नागरिकांची, वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढण्यापूर्वी बहुतांश ठिकाणी साचलेले पाणी ओसरले आणि रस्ते वाहतूक तसेच शाळा-कार्यालयांची ये-जा सुरळीत झाली.

दक्षिण मुंबईत पावसाचा जोर तुलनेने कमी

रविवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. महापालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदीनुसार, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुलुंड (वीणा नगर) येथे तब्बल २१० मिमी, गावणपाडा येथे १६७ मिमी, वर्सोवा येथे १६७ मिमी, गोरेगाव येथे १२९ मिमी, सायन येथे १२४ मिमी आणि मरोळ येथे १२२ मिमी पावसाची नोंद झाली. त्याउलट दक्षिण मुंबईत पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला. भायखळा येथे ४३ मिमी, मलबार हिल येथे ४५ मिमी आणि माटुंगा येथे ६१ मिमी पाऊस झाला.आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेत २४ तासांत १०३ मिमी पावसाची नोंद झाली. तर कुलाबा वेधशाळेत केवळ ३०.४ मिमी पाऊस झाला. तर ठाणे आणि नवी मुंबईत अनुक्रमे ११७ मिमी आणि सरासरी ११८ मिमी पावसाची नोंद झाली.

आपत्कालीन यंत्रणा रात्रभर कार्यरत

दरम्यान, या पावसामुळे मुंबई अग्निशमन दल आणि महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा रात्रभर कार्यरत होत्या. शहरात शॉर्टसर्किटच्या १६ घटना घडल्या असून त्यापैकी नऊ घटना पूर्व उपनगरात नोंदविण्यात आल्या. झाडे किंवा फांद्या कोसळल्याच्या ३४ तक्रारी प्राप्त झाल्या, तर भिंत किंवा घराचा काही भाग कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. सर्व घटनांमध्ये तातडीने मदतकार्य करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सात धरणांत फक्त ६.९३ टक्के पाणीसाठा

एकीकडे मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले असले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात अद्याप अपेक्षित वाढ झालेली नाही. सध्या धरणांमध्ये केवळ १ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या ६.९३ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ३९.५० टक्के होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

HSRP उद्यापासून सक्तीची; नंबरप्लेट नसल्यास १००० ‌रुपये दंड, आरटीओ सेवाही मिळणार नाहीत

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द; 'त्या' शाळांना एक लाख रुपयांपर्यंत दंड

नराधमाला फाशी! नसरापूर अत्याचारप्रकरणी ५५ दिवसांत निकाल; आरोपीला सोडणे समाजासाठी घातक- न्यायालयाचे मत

पुढील वर्षापासून टीईटी ऑनलाइन; शिक्षण मंत्री भुसे यांची घोषणा

राममंदिर अपहार आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव; फैजाबाद बार असोसिएशनचा निर्णय; चंपत राय यांनी अयोध्या सोडावी, केली मागणी