मुंबई

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ट्रान्सजेंडर ‘गुरु माँ’ ज्योतीला अटक, ३० वर्षांपासून बनावट कागदपत्रांवर भारतात वास्तव्य

गेल्या ३० वर्षांपासून भारतात बनावट ओळखपत्रांवर वास्तव्य करणाऱ्या ‘गुरु माँ’ ज्योतीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रफीक नगर आणि गोवंडी परिसरात प्रसिद्ध ट्रान्सजेंडर अध्यात्मिक गुरु म्हणून ती ओळखली जात होती.

नेहा जाधव - तांबे

गेल्या ३० वर्षांपासून भारतात बनावट ओळखपत्रांवर वास्तव्य करणाऱ्या ‘गुरु माँ’ ज्योतीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रफीक नगर आणि गोवंडी परिसरात प्रसिद्ध ट्रान्सजेंडर अध्यात्मिक गुरु म्हणून ती ओळखली जात होती. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, ही व्यक्ती प्रत्यक्षात बांगलादेशातील नागरिक बाबू अयान खान असल्याचे उघड झाले आहे.

बनावट कागदपत्रांवर भारतात वास्तव

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती उर्फ बाबू अयान खान हिने ३० वर्षांपूर्वी भारतात अनधिकृतरित्या प्रवेश केला. त्यानंतर तिने आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र यांसारखी बनावट भारतीय कागदपत्रे तयार केली होती. या कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान अनेक विसंगती आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर ती बांगलादेशातील नागरिक असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईतील ट्रान्सजेंडर समाजात ‘गुरु माँ’ म्हणून ओळख

ज्योती गेली अनेक वर्षं रफीक नगर आणि गोवंडी परिसरात राहत होती. तिने ट्रान्सजेंडर समाजात स्वतःची ‘अध्यात्मिक गुरु’ म्हणून प्रतिमा निर्माण केली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तिचे सुमारे ३०० अनुयायी आहेत. तिच्या नावावर या भागात २० हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. काळाच्या ओघात तिचा प्रभाव एवढा वाढला की अनेक जण तिला ‘गुरु माँ’ म्हणून मान देऊ लागले.

शिवाजी नगर छाप्यानंतर वाढला संशय

शिवाजी नगर परिसरात काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान पोलिसांना ज्योतीवरही संशय आला.
त्यावेळी तिने वैध वाटणारी भारतीय ओळखपत्रे दाखवून सुटका मिळवली होती. मात्र, पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू ठेवला आणि काही महिन्यांच्या चौकशीनंतर ही सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

मोठ्या जाळ्याचा तपास सुरू

ज्योतीने दाखवलेली ही बनावट ओळखपत्रे कोणत्या मार्गाने तयार करण्यात आली आणि या प्रकरणामागे मोठं जाळं आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणात काही सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता देखील पोलिस तपासत आहेत.

मुंबई पोलिसांनी या कारवाईला बेकायदेशीर स्थलांतर आणि बनावट कागदपत्रांविरोधातील कठोर पाऊल असे म्हटले आहे. तीन दशकं खोट्या नावाने जगणाऱ्या आणि शेकडो अनुयायांवर प्रभाव टाकणाऱ्या ‘गुरु माँ’च्या अटकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. सध्या पोलिस तिच्या नेटवर्कचा, आर्थिक व्यवहारांचा आणि मालमत्तेच्या मालकीचा सखोल तपास करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर