मुंबई : गाडी खरेदी करताना अनेकांना आकर्षक पसंतीचा नंबर मिळवण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नवीन दुचाकी वाहनाची एम एच ४७ डब्ल्यू ही नवी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तरी दुचाकी खरेदी करताना आकर्षक पसंतीचा नंबर हवा असेल तर १९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचे शुल्क आकारण्यात येणार आहे, असे बोरिवली प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
आकर्षक अथवा पसंती क्रमांक घेण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर क्रमांक देण्यात येणार आहे. मालिका सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आकर्षक क्रमांकासाठी विहीत पद्धतीनुसार लिलाव करण्यात येईल. त्यानुसार एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सर्व अर्जदार मालिका सुरू होण्याच्या दिनांकाच्या दिवशी संबंधित क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा धनाकर्ष संबंधित रोखपाल यांना सादर करतील. त्याच दिवशी १९ सप्टेंबरला दुपारी २ वाजेपर्यंत लिलाव बोलीच्या रकमेचा धनादेश बंद पाकिटात संबंधित रोखपालाकडे सादर करावा लागणार आहे. या बंद पाकिटातील धनादेश नोंदणी प्राधिकाऱ्यांसमोर उघडले जाऊन सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास आकर्षक अथवा पसंती क्रमांक देण्यात येईल. अर्जदाराने १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत बोली रकमेचा बंद पाकिटातील धनाकर्ष जमा केला नाही, तर सदर क्रमांक दुसऱ्या अर्जदारास देण्यात येईल, असे बोरिवलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम कासार यांनी सांगितले.