मुंबई : नद्यांमधील मायक्रोप्लास्टिकचे वर्गीकरण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने तयार केलेल्या उपकरणाने मोठे यश मिळवले आहे. या उपकरणाला भारत सरकारतर्फे डिझाईन पेटंटची मंजूर झाले आहे.
डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरातील पर्यावरण शास्त्र विभागाचे संशोधक डॉ. पांडुरंग यशवंत पाटील यांच्या या अभिनव उपकरणाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून यामुळे नदी प्रदूषण नियंत्रणासाठीच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे. नद्यांच्या प्रवाहात ५ मिलीमीटरपेक्षा लहान असलेले मायक्रोप्लास्टिक कण अडवून, त्यांचे पद्धतशीर वर्गीकरण करता येईल अशी या उपकरणाची रचना करण्यात आहे.
नदीतील जैविक कचरा (पाने, काड्या) आणि प्लास्टिक कण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी यात ‘मल्टी-स्टेज फिल्टरेशन’ संकल्पनेचा विचार करण्यात आला आहे. हे उपकरण भविष्यात सौर ऊर्जेचा वापर करून चालवण्याचे आणि त्यात स्वयंचलित फिल्टर क्लीनिंग व रिअल-टाइम डेटा देणारे स्मार्ट सेन्सर्स समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे.
रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीच्या संवेदनशील नदी परिसंस्थांचा विचार करता, या उपकरणाचे डिझाईन भविष्यात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
नदी संवर्धनासाठी महत्त्वाचे
नद्यांच्या पातळीवरच मायक्रोप्लास्टिक वेगळे करू शकणारे तंत्रज्ञान डिझाईन करणे ही शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी काळाची गरज आहे. हे डिझाईन पेटंट म्हणजे या उपकरणाच्या प्रत्यक्ष निर्मितीच्या आणि नदी संवर्धनाच्या दिशेने टाकलेले पहिले अधिकृत पाऊल असल्याचे संशोधक डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले.