मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला अपघात झाला असून यात ती जखमी झाली आहे. कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ तिच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात तिच्या कारचालकालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
शूटिंग संपवून घरी परतताना, मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ भरवेगात जाणाऱ्या तिच्या कारने दोन मजुरांना उडवले. चालकाचे कारवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअरबॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. तिच्या गाडीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. उर्मिलाच्या तब्येतीविषयी कोणतीही माहिती मिळू - शकली नसली तरी चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.
'दुनियादारी', 'शुभमंगल सावधान', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमध्ये झळकलेली उर्मिला ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. महेश कोठारे यांची सून आणि आदिनाथ कोठारे यांची पत्नी अशीही उर्मिलाची ओळख आहे.