मुंबई : वाढत्या तापमानाचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा त्यात बाष्पीभवन यामुळे सातही धरणातील पाणीसाठा दररोज २५० दशलक्ष लिटरने कमी होत आहे. आधीच गळती व चोरीमुळे ३४ टक्के पाणी वाया जात असताना बाष्पीभवनामुळे २५० दशलक्ष लिटर पाणी हवेत विरत असल्याने ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात होणारी घट लक्षात स्विमिंग पूल मनोरंजन क्लबचे पाणी बंद करण्यात येणार आहे.
अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
व्यवस्थापन, देखरेखीचे आवाहन
बाष्पीभवनाचे प्रमाण मोजण्यासाठी विशेष पॅनचा वापर केला जात असून त्यातून पाण्याच्या पातळीतील घट नोंदवली जाते. भातसा धरणापासून पिसे-पांजरापूरपर्यंत सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा यंत्रणा पसरलेली असल्याने पाण्याचे व्यवस्थापन आणि देखरेख हेही महत्त्वाचे आव्हान आहे.
एल-निनोचे आव्हान
एकीकडे पाणीगळती, अनधिकृत जोडण्या आणि चोरी रोखण्याचे आव्हान तर दुसरीकडे बाष्पीभवनामुळे होणारी घट, असे दुहेरी आव्हान पालिकेसमोर आहे. त्यात एल निनोमुळे पावसाच्या अनिश्चिततेची चिंता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर, गळतीवर नियंत्रण व पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.