पूनम पोळ/ मुंबई
काही दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील जैन मंदिरावर तोडक कारवाई केल्याप्रकरणी वार्ड अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दादर येथील कबुतरखाना हटवण्याबाबत पालिकेचे अधिकारी धास्तावले आहे. जैन समाजाशी कबुतरांचे अतूट नाते आहे. आणि जर कबूतर खाना या जागेवरून हटवन्याचा प्रयत्न केला तर याठिकाणीही विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडक कारवाईनंतरची पुनरावृत्ती होऊ शकते, त्यामुळे सध्या कबूतरखाना हलवण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू केल्या होत्या. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्याच्या तक्रारींमुळे हा कबुतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला होता. दरम्यान, कबुतराच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर खरोखरच परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी पालिकेच्या केईएम आणि शीव या दोन रुग्णालयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी मनसेने दादरचा कबुतरखाना हटवण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी पालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेण्याच्या विचारात होते. परंतु, विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने तोडक कारवाई केली. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणानंतर पालिकेच्या अन्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे कबुतरांना जैन समाजात मान
कबुतर हे अशा मोजक्या पक्ष्यांपैकी एक आहे जे फक्त धान्य खाणारे असतात आणि जमिनीवरून कोणताही कीटक किंवा तत्सम प्राणी आपल्या खाद्यासाठी उचलत नाहीत. कबुतरदेखील पूर्णपणे लढाऊ नाही आणि त्याच्या अस्तित्वासाठी इतर कोणत्याही सजीव वस्तूला धोका देत नाही. म्हणून, ते एका प्रकारे जैन धर्माच्या तत्त्वांचे पालन करते जे अहिंसेला त्याच्या प्रमुख गुणांपैकी एक म्हणून मान्य करते आणि म्हणून जैन त्याचा आदर करतात.