मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील १३ हजार ३९५ सदनिकांच्या विक्रीसाठी https:// bookmyhome.mhada.gov.in/ या नवीन संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. या लॉटरीत अर्जदारांना पसंतीचे घर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील लॉटरीत समाविष्ट अर्जदारांना उपलब्ध घरांपैकी कुठले घर मिळेल याबाबत निश्चिती नव्हती. मात्र, 'बुक माय होम' संकेतस्थळामुळे अर्जदारास आपल्या पसंतीचे घर निवडण्याची मुभा मिळणार आहे. 'बुक माय होम'मुळे अर्जदारांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळाला असून ज्याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरे अर्जदार संकेतस्थळावर पाहू शकतात, पात्रता व पसंतीनुसार विशिष्ट घराची निवड करू शकणार आहेत.
'बुक माय होम' या संकेतस्थळावर कोकण मंडळाच्या विरार बोळिंज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील विक्री न झालेली घरे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारास या सदनिकांमधून मजला व सदनिका आपल्या पसंतीनुसार निवडता येणार असल्याचे कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या घरांव्यतिरिक्त इतर घरांसाठी पात्रतेच्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. तसेच उत्पन्न गटाचे कोणतेही निकष ठेवण्यात आलेले नाहीत.