मुंबई : गेल्या महिनाभरात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ४० टक्के भरले आहेत. मुंबईला दरवर्षी एकूण १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या तलावांत ५,८२,१७५ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात २,४४,४३९ दशलक्ष पाणी साचले आहे. म्हणजेच भातसा तलावात सध्या ३४ टक्के पाणीसाठा साठला आहे. तर, तानसा आणि मध्य वैतरणा तलावांमध्येही समाधानकारक वाढ झाली आहे. तानसा तलावात ६१,७०७ दशलक्ष लिटर साठा असून, हा तलाव ४२.५३ टक्के भरला आहे. तसेच मध्य वैतरणा तलाव ४३.२८ टक्के भरला आहे. अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा या चार तलावांतील एकूण पाण्याचा साठा आता ३,२२, ९०६ दशलक्ष लिटर झाला आहे.
असा होतो मुंबईला पाणीपुरवठा
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दहिसर चेकनाक्यापासून वांद्रेपर्यंतची पश्चिम उपनगरे आणि माहीम ते मलबार हिलपर्यंतच्या शहराच्या पश्चिम भागाला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि तानसा या जलाशयांमधून पाणी मिळते. तर पूर्व उपनगरे आणि शहराच्या पूर्व भागाला भातसा, विहार आणि तुळशी या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. येथून येणारे पाणी पांजरपोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते आणि मुलुंड चेकनाक्यापासून शीवपर्यंतची पूर्व उपनगरे तसेच माझगावपर्यंतच्या शहराच्या पूर्व भागात वितरीत केले जाते.