मुंबई

मुंबईचे पाणी महागले, पाणीपट्टीत ८ टक्के दरवाढ

प्रतिनिधी

मुंबई : महागाईमुळे सामान्यांचे जगणे जिकिरीचे झाले असताना दोन वर्षांपासून रखडलेल्या पाणीपट्टीत तब्बल ८ टक्के वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी ही दरवाढ झाली असून १६ जून २०२३ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी या दरवाढीला मंजुरी दिली आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. १२० किलोमीटर अंतरावरून पाइपलाईनद्वारे मुंबईला पाणीपुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणे, पाणी शुद्ध करणे, अस्थापना खर्च, पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी, देखभाल दुरुस्ती, विद्युत खर्च अशा विविध कामांसाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होतो. त्यामुळे २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने याबाबत प्रशासनाला अधिकार दिले आहेत.

या सर्वाची गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव बनवण्यात आला आहे. यंदाच्या वर्षात या सर्व बाबींच्या खर्चात ४४.६४ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीपट्टीत वाढ करण्यात येत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ केली जाते. मात्र, कोरोनामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत पाणीपट्टी, मालमत्ता कर व अन्य करांमध्ये पालिकेने वाढ केली नव्हती, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस