‘मुमुक्षू’ बोर्ड गेमने वेधले देशाचे लक्ष; बदलत्या पिढीला भारतीय जीवनमूल्यांची अनोखी मेजवानी 
मुंबई

Mumbai : ‘मुमुक्षू’ बोर्ड गेमने वेधले देशाचे लक्ष; बदलत्या पिढीला भारतीय जीवनमूल्यांची अनोखी मेजवानी

आजच्या डिजिटल युगात लहान मुले आणि तरुण पिढी मोबाईल गेम्सच्या आहारी जात असतानाच त्यांना स्क्रीनपासून दूर करून पुन्हा एकदा कुटुंबासोबत जोडण्यासाठी आणि कौटुंबिक संवाद वाढवण्यासाठी दादरच्या साहिलराजे शिर्के या उच्चशिक्षित तरुणाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

Swapnil S

मुंबई : आजच्या डिजिटल युगात लहान मुले आणि तरुण पिढी मोबाईल गेम्सच्या आहारी जात असतानाच त्यांना स्क्रीनपासून दूर करून पुन्हा एकदा कुटुंबासोबत जोडण्यासाठी आणि कौटुंबिक संवाद वाढवण्यासाठी दादरच्या साहिलराजे शिर्के या उच्चशिक्षित तरुणाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. साहिलराजे यांनी भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांवर आधारित ‘मुमुक्षू’ नावाचा एक अभिनव आणि अभूतपूर्व ‘लाइफ सिम्युलेशन’ म्हणजेच जीवन-अनुकरण प्रकारातील बोर्ड गेम विकसित केला आहे. अत्यंत कमी कालावधीत या खेळाला देशभरातून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सध्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या गेमची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जिओपॉलिटिक्सचे अभ्यासक असलेले साहिलराजे शिर्के यांनी काही वर्षे परदेशात नोकरी केली. तेथे त्यांनी खेळातून शिक्षण देण्याच्या आधुनिक पद्धतीचा अतिशय जवळून अभ्यास केला. मात्र, आपल्या देशासाठी काही तरी वेगळे आणि मूल्यवर्धित घडवण्याच्या इच्छेने त्यांनी परदेशातील सुखासीन नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सुमारे दोन ते अडीच वर्षांच्या सखोल अभ्यास आणि अविरत परिश्रमांतून त्यांनी ‘मुमुक्षू’ या संकल्पनेला मूर्त रूप दिले तसेच त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेतही उद्योजक म्हणून देशाचे नेतृत्व केले आहे.

कसा आहे खेळ?

‘मुमुक्षू’ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून तो मानवी जीवनाचा समतोल राखायला शिकवणारा एक मार्गदर्शक अनुभव आहे. यामध्ये खेळाडू स्वतःच्या भूमिकेतून जन्मापासून ते सोळा संस्कारांमार्फत मोक्षापर्यंतचा प्रवास अनुभवतात. भारतीय तत्त्वज्ञानातील चार पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांसह गृहस्थधर्म, माया, कर्म आणि सिद्धी या संकल्पनांच्या अवतीभोवती हा खेळ विणला गेला आहे.

वैयक्तिक ध्येये, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक कर्तव्ये आणि आध्यात्मिक साधना यांचा योग्य मेळ घालत जीवनातील आव्हानांवर मात करणे आणि संसाधनांचे चोख व्यवस्थापन करणे, हेच या खेळातील यशाचे गमक आहे.

खेळाची वैशिष्ट्ये

  • खेळाच्या डिझाइनमध्ये भारताच्या १२ पारंपरिक कलाशैलींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ओडिशाचे पट्टचित्र, राजस्थानची पिचवाई, सिक्कीमची थंका, केरळची म्युरल आर्ट आणि विशेष आकर्षण ठरणारे वारली पेंटिंग यांद्वारे खेळाडूंना भारतीय कलेचीही समृद्ध ओळख करून दिली जाते.

  • देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये या खेळाची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून याची पेटंट प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे.

  • पद्मभूषण कपिल कपूर, सुप्रसिद्ध लेखक राधाकृष्णन पिल्लई आणि आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांनी या खेळाच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

  • लवकरच हा खेळ बोर्ड गेमसह डिजिटल आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजेच व्हीआर स्वरूपातही बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे.

  • मनोरंजनासोबतच विचारक्षमता, निर्णयक्षमता आणि सुसंस्कार देणारा हा खेळ नव्या पिढीसाठी नक्कीच एक अर्थपूर्ण पर्याय ठरत आहे.

MMRमध्ये लवकरच ‘फ्लेमिंगो ब्ल्यू कार्बन नागरी संकुल’; ‘नॅटकनेक्ट’च्या श्वेतपत्रिकेची केंद्राकडून दखल, राज्य प्राधिकरणाला ‘प्राधान्याने’ कार्यवाहीचे निर्देश

Mumbai : खात्यात फसवणुकीचे पैसे जमा झाले म्हणजे गुन्हा नव्हे; गिरगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी

लोकसंख्या बदलाबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन - अमित शहा

शेतकऱ्यांना दिलासा; आचारसंहितेतही कर्जमाफी योजना आणण्यास निवडणूक आयोगाची संमती