मिहिर कोटेचा, राकेश शेट्टी (डावीकडून) 
मुंबई

भाजपच्या वर्चस्वाला मविआचे आव्हान; पुन्हा एकदा मिहिर कोटेचा की, नव्या चेहऱ्याला मतदारांकडून संधी?

Maharashtra assembly elections 2024 : गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेल्या मुलुंड विधानसभा मतदारसंघात या वेळी भाजपचे विद्यमान आमदार मिहिर कोटेचा हे दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार असून येथील भाजपच्या वर्चस्वाला महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. येथे आघाडीतर्फे मैदानात उतरलेल्या राकेश शेट्टी यांनी भाजपविरोधात आक्रमक प्रचार चालविला आहे.

Swapnil S

शिरीष पवार, मुंबई

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेल्या मुलुंड विधानसभा मतदारसंघात या वेळी भाजपचे विद्यमान आमदार मिहिर कोटेचा हे दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार असून येथील भाजपच्या वर्चस्वाला महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. येथे आघाडीतर्फे मैदानात उतरलेल्या राकेश शेट्टी यांनी भाजपविरोधात आक्रमक प्रचार चालविला आहे.

मुलुंडमध्ये १९९० मध्ये वामनराव परब, १९९५ मध्ये किरीट सोमैया, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सरदार तारासिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. त्यानंतर २०१९ मध्ये तारासिंग यांनी प्रकृतीच्या कारणाने उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने मिहिर कोटेचा भाजपतर्फे लढले आणि ५७ हजार ३४८ मतांच्या अधिक्याने निवडून आले होते. त्या वेळी मनसेच्या हर्षला चव्हाण (२९,९०५) दुसर्या तर, काँग्रेसचे गोविंद सिंह (२३,८५४) तिसऱ्या क्रमांकावर होते.

२०१४ मध्ये भाजपचे सरदार तारासिंग हे येथून ६५ हजार ३०७ मतांच्या फरकाने निवडून आले होते. काँग्रेसचे चरणसिंग सप्रा दुसऱ्या क्रमांकावर (२८,५४३) तर, शिवसेनेचे प्रभाकर शिंदे (२६,२५९) तिसऱ्या क्रमांकावर होते. २००९ मध्ये तारासिंग यांनी २७ हजार ७९६ मतांच्या अधिक्याने ही जागा जिंकली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या मुलुंड क्षेत्रातून भाजपचे मिहिर कोटेचा यांना ६० हजार ४४२ मतांची आघाडी मिळाली होती. यावरून या विधानसभा मतदारसंघावर असलेली भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड दिसून येते. अर्थात सरदार तारासिंग यांचे सर्व स्तरांत लोकप्रिय असलेले नेतृत्व त्यांच्या मृत्यूमुळे आता अस्तित्वात नाही.

महाविकास आघाडीसाठी कठीण असलेल्या अशा या मतदारसंघात विधानसभेला काँग्रेसचे राकेश शंकर शेट्टी हे आघाडीचे उमेदवार आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या शेट्टी यांनी प्रचारात स्थानिक मुद्दे मांडत भाजपच्या धोरणांना तिखट भाषेत लक्ष्य केले आहे. त्यात मिठागरांच्या जागेवर घरबांधणीचा मुद्दाही आहे. भाजपचे मिहिर कोटेचा यांच्याकडे मतदारांना सांगण्यासाठी विकासयोजनांची मोठी जंत्री आहे. त्यात विकास नियोजन आराखडा, प्रकल्पग्रस्तांसाठी घरे, राष्ट्रीय उद्यानातील घरांचे स्थलांतर, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते प्रकल्प आदींचा समावेश आहे. कोटेचा आणि शेट्टी यांच्यात थेट लढत होणार असली तरी, बसप, रासप, वंचित बहुजन आघाडी आदी पक्ष तसेच तीन अपक्ष मिळून एकूण १० उमेदवार येथून रिंगणात आहेत. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजपचे कोटेचा यांनी आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची तक्रार केली आहे. या मतदारसंघात गुजराती, मराठी भाषिकांचे प्रमाण मोठे आहे. कोटेचा पुन्हा निवडून येणार की, मतदार नव्या चेहर्याला संधी देणार, याची येथे उत्सुकता आहे.

समस्या

कामगार रुग्णालयाची दुरावस्था.

पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांमुळे उडणारी धूळ, हवेचे प्रदूषण.

अपुरा पाणीपुरवठा.

डम्पिंग ग्राऊंडची दुर्गंधी.

खंडित होणारा वीजपुरवठा.

रस्ते- पदपथावरील अतिक्रमणे, वाहतूककोंडी.

एकूण मतदार - २,९६,६८५

पुरुष - १,५१,२९७

महिला - १,४५,३६६

तृतीयपंथी - २२ 

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी