नालासोपारा पूर्व येथील धानिवबाग परिसरातील गुजरात CNG पंपावर जादा वसुलीचा रॅकेट उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत हा पंप सील केला आहे. रिक्षाचालकांकडून प्रति किलो CNGवर ३० ते ५० रुपये अधिक आकारले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
रिक्षाचालक बनून छापा; जादा वसुली रंगेहात पकडली
वसई तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी भागवत सोनार यांनी मिळालेल्या तक्रारींच्या आधारे २७ मार्च रोजी दुपारी छापा टाकला. यावेळी ते रिक्षाचालकाच्या वेशात पंपावर पोहोचले होते. तपासणीदरम्यान कर्मचारी बलदेव यादव हा प्रति किलो ५० रुपये जादा आकारताना रंगेहात पकडला गेला.
रॅकेटचा पर्दाफाश
प्राथमिक चौकशीत पंपावरील कर्मचारी नियमितपणे प्रत्येक व्यवहारात ३० ते ५० रुपये अतिरिक्त वसूल करत असल्याचे समोर आले. ही रक्कम कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालकांमध्ये वाटली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अधिकाऱ्याला घेराव, धक्काबुक्की
या गैरप्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. व्यवस्थापक सुरेश मिश्रा आणि इतर कर्मचाऱ्यांनी सोनार यांना घेराव घालून बाहेर जाण्यापासून रोखले तसेच धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी बलदेव यादव घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांची तत्काळ कारवाई
सोनार यांनी पेल्हार पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्याची सुटका केली. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९६० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
गुन्हा दाखल; तपास सुरू
या प्रकरणी मालक समरनाथ पांडे, व्यवस्थापक सुरेश मिश्रा तसेच कर्मचारी बलदेव यादव, राजू खरख, संदीप शर्मा, सुनीता आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(१), १२१(२) तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कलम ३ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंप सील; पुढील तपास सुरू
सध्या संबंधित CNG पंप सील करण्यात आला असून हा गैरप्रकार किती काळ सुरू होता आणि आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याचा तपास पेल्हार पोलिसांकडून सुरू आहे.