मुंबई

मुंबई उपनगरात राबवला जाणार नमो-११ सूत्री कार्यक्रम

नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत मुलुंड येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनहितासाठी ‘नमो ११ सूत्री’ कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेऊन मुंबई उपनगर जिल्ह्यात सदर कार्यक्रम राबवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

‘नमो-११ सूत्री’ कार्यक्रमांतर्गत मुंबई उपनगर जिल्हात पालक मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा विकास, शाश्वत विकास इत्यादी विविध ११ विषयांवर आधारित लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील. मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, चांदिवली, अंधेरी (पश्चिम), घाटकोपर (पूर्व), वांद्रे (पूर्व), मागाठणे, मुलुंड, मालाड, कांदिवली, विलेपार्ले या ठिकाणी सदर उपक्रमांचा ८ नोव्हेंबर रोजी शुभारंभ केला जाणार आहे.

नमो महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कुर्ला येथील बचत गटांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. नमो कामगार कल्याण अभियानांतर्गत चांदिवली येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यात येईल. मत्स्य व्यवसायासारख्या कृषी संलग्न व्यवसायात कार्यरत असलेल्या मच्छिमारांचे उत्पन्न दुपटीने वाढावे, याकरिता नमो शेततळी अभियानांतर्गत अंधेरी (पश्चिम) येथे मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिलांना शीतपेट्यांचे वाटप करण्यात येईल. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव अभियानांतर्गत खार (पश्चिम) येथे ऑरगॅनिक उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत मुलुंड येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानांतर्गत अंबोजवाडी, मालवणी, मालाड (पश्चिम) येथे क्रीडा मैदान विकासकामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत

मविआला डोकेदुखी; विधान परिषदेतील संख्याबळ आणखी घटणार

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल; शनिवारी ६० टक्के मतदान

मध्य रेल्वे मार्गावर आज ब्लॉक