मुंबई

जागर आदिशक्तिचा : ताडवाडीत श्रद्धा आणि सामाजिक कार्याचा संगम; सावंतभोसले प्रतिष्ठानकडून मुंबईची कोकणाशी नाळ

नवशक्ती Web Desk

शिरीष पवार / मुंबई

ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक परंपरेचे जतन करतानाच सामाजिक ऐक्य साधून रचनात्मक काम कसे उभे करावे, याचा वस्तूपाठ मुंबईतील 'सावंतभोसले श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान'च्या नवरात्र उत्सवाने घालून दिला आहे.

मेवाडच्या महाराणा राजघराण्याची कुलदेवता असलेल्या बाण मातेचे मंदिर राजस्थानातील चितोडगडावर आहे. याच बाण मातेचे स्थान म्हणून कोकणातील सावंतवाडीच्या कुणकेरी गावात सावंतभोसले वंशातील मंडळींनी कुलस्वामिनी भवानी व्यानमातेची स्थापना केली. गावातील एका पुरातन घरातील देव्हाऱ्यात ही देवी बसविण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या आधीच्या पिढ्यांपासूनच महाराष्ट्रात आलेल्या सावंतभोसले मंडळींचे अस्तित्व प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, रायगड आणि काही प्रमाणात कोल्हापूर भागातही आहे. त्यापैकी काही जणांनी कुणकेरीच्या व्यान मातेचे मंदिर हे मुंबईत उभारण्याची धडपड ३८ वर्षांपूर्वी सुरू केली. मुंबईतील मंदिरासाठी देवीचा कौल घेतला असता तिने मंदिर उभारणीस नकार दिला आणि मुंबईत माझे मंदिर न बांधता प्रतिमापूजन करा, असा संदेश दिल्याच्या श्रद्धेतून मंडळाची वाटचाल सुरू झाली. त्यातून २५ वर्षांपूर्वी माझगावच्या ताडवाडीत छोटेखानी नवरात्र उत्सव सुरू झाला. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून त्याला लोकांचे प्रचंड पाठबळ मिळत आहे, अशी माहिती सावंतभोसले श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस कृष्णा सावंतभोसले यांनी ‘नवशक्ति’ला दिली. नवरात्रात व्यानमातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली जाते. तिच्या वार्षिक ओटी भरणीसाठी मुंबईतील एक हजाराहून अधिक कुटुंबे येथे येतात. विजयादशमीच्या दिवशी देवीला सोने अर्पण करण्याचा सोहळा होतो. विजय सावंतभोसले हे 'सावंतभोसले श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान' प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.

भक्तनिवासासह वाचनालय, ग्रंथालय आणि रुग्णवाहिका सेवा

भवानी व्यानमातेच्या वार्षिक दर्शनासाठी कुणकेरी येथे जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी तेथे सुसज्ज भक्तनिवास बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचे तळ अधिक पहिल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. वाचनालय, ग्रंथालय उभारून रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा प्रतिष्ठानचा उद्देश आहे. मुंबईत नवरात्रीत मंडळाकडून गरजूंसाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. याशिवाय कोकणात पंधरा वर्षांपासून डोळे तपासणी, चष्मे वाटप शिबिरे घेतली जातात. समाज बांधवांसाठी मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्याला प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रायगडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना