मुंबई : यंदा २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्रीत ९ दिवस गरबा दांडिया खेळण्यासाठी बच्चेकंपनीसह मोठ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गरब्यासाठी यंदा बाजारात नवनवीन, आकर्षक रंगीबेरंगी कुर्ता, चनिया चोली, पुरुषांना भुरळ पाडणारे आकर्षक जॅकेट बाजारात उपलब्ध आहेत.
सध्या सर्वांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले असून भुलेश्वर बाजारात दांडियासाठी पारंपरिक कपड्यांची खरेदी करण्यास मोठी गर्दी उसळली आहे. परंपरागत कुर्ता, चनिया चोली, लहेंगा-चोली यासारख्या पोशाखांना ग्राहक विशेष पसंती देत आहेत. देशभरात नवरात्रौत्सव साजरा केला जात असला तरी मुंबईतील गरब्याची धूम काही वेगळीच असते.
मुंबईत दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी तरुणाईसोबतच लहान मुलांच्याही आकर्षक पोशाखांची जोरदार खरेदी होत असते. मुलांसाठी लहान आकारातील रंगीबेरंगी कुर्ते, चनिया चोली खरेदीसाठी पालकांचे पाय आपसूकच भुलेश्वरच्या मार्केटमध्ये वळतात. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक नवरात्रौत्सवात खरेदीसाठी भुलेश्वर येथे येत असतात.
यंदा ट्रेंडमध्ये मिरर वर्क, सिक्विन्स डिझाईन्स आणि राजस्थानी कढाई असलेले कुर्ते व चनिया-चोली मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मुलांमध्ये जॅकेट स्टाईल कुर्त्यांची क्रेझ वाढली आहे. दरम्यान, लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर प्रिंट्स असलेले पोशाखही उपलब्ध झाले असून अहमदाबाद, जोधपूर येथून खास गरब्यासाठी आकर्षक पोशाख मागवण्यात आले आहेत, असे भुलेश्वर कबुतर खाना येथील ‘जोधपूर साडी सेंटर’चे मालक मनिष दुबे यांनी 'दैनिक नवशक्ति' शी बोलताना सांगितले.
रोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असून नवरात्रौत्सवाचा दिवस जवळ आल्याने, शेवटच्या क्षणी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. भुलेश्वर मार्केटमध्ये प्रत्येक सणासुदीचे साहित्य खरेदीसाठी लोक येत असतात. आम्ही नवरात्रौत्सवात विशेष करुन भुलेश्वर मार्केटमध्ये खरेदीसाठी येत असतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक डिझाईन असलेले लहान मुलांसह मोठ्यांचे पोशाख उपलब्ध असतात. त्यामुळे दरवर्षी न चुकता भुलेश्वर मार्केटमध्ये येतो, असे येथे खरेदीसाठी आलेल्या ज्योती पाटील यांनी सांगितले.