मुंबई

आता अभ्यासाचे नो टेन्शन! गिरगावात दोन हजार चौरस फूट जागेत अभ्यासिका

महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : आजची तरुण पिढी देशाचे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यात जागेची कमतरता भासू नये, यासाठी गिरगाव खोताची वाडी येथे अभ्यासिका सुरt करण्यात आली आहे. दोन हजार चौरस फूट जागेत दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यास करता येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते अभ्यासिकाचे लोकार्पण झाले. शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

मुंबईत अनेक कुटुंबे लहान आकारांच्या घरात एकत्र राहतात. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांना अभ्यास करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी खोताची वाडी परिसरात प्रशस्त अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिकेला दिले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत मुले आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या अभ्यासिकेमध्ये एकाचवेळी जवळपास ५० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र टेबल आहे. त्यासोबत स्पर्धा परीक्षेची पुस्तकेदेखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अभ्यासासाठी पूरक वातावरण असून सीसीटीव्हीची देखील व्यवस्था आहे. प्राथमिक स्तरावर दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत अभ्यासिका सुरू राहणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, रविंद्र संघवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भारतातच खेळा, नाहीतर गूण गमवा! ICC चा बांगलादेशच्या मागणीला नकार, सुरक्षेला धोक्याचा दावाही फेटाळला - रिपोर्ट

मोदी-शहांविरोधात घोषणाबाजी महागात! 'त्या' विद्यार्थ्यांचे तात्काळ निलंबन होणार; JNU चा इशारा; एफआयआरही दाखल

BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

Zilla Parishad Election Maharashtra : आज जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा?

भाजपकडून अजितदादांची कोंडी; सावरकरांचे विचार मानावेच लागतील!