FPJ/ Rucha Kanolkar
मुंबई

आता आव्हान गर्डर खाली घेण्याचे! गोखले पुलाची तुळई ९० मीटरपर्यंत सरकविण्‍याचे काम यशस्वी

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्‍या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर एकूण ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम रविवारी, ८ सप्‍टेंबरच्या रात्री यशस्‍वी झाल्यानंतर ती आता आठ मीटर खाली घेण्याचे आव्हान पेलले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्‍या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर एकूण ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम रविवारी, ८ सप्‍टेंबरच्या रात्री यशस्‍वी झाल्यानंतर ती आता आठ मीटर खाली घेण्याचे आव्हान पेलले जाणार आहे.

येत्या काही दिवसांत ही तुळई टप्प्याटप्प्याने आठ मीटरपर्यंत खाली आणण्यात येईल. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्‍यात येणार आहे. नियोजित उंचीवर तुळई खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील.

पश्चिम रेल्‍वे प्रशासनाच्‍या परवानगीनंतर व पुढील रेल्‍वे 'ब्‍लॉक' मिळाल्‍यानंतर हे काम  पूर्ण केले जाईल. त्‍यादृष्‍टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पश्चिम रेल्वेसोबत समन्‍वय साधण्‍यात येत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या वाहतुकीदरम्‍यान महत्त्वाचा दुवा असलेल्‍या गोखले पुलाच्या पहिल्‍या टप्‍प्‍यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग सर्वसामान्‍य जनतेसाठी २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. त्‍यावरून हलक्‍या वाहनांना प्रवेश देण्‍यात आला आहे. आता या पूल उभारणीतील महत्त्वाचा टप्पा म्‍हणजे दुसरी तुळई स्थापन करण्याचे काम होय.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या पूल विभागाने पश्चिम रेल्‍वे प्रशासनासोबत योग्‍य समन्‍वय साधून ही मोहीम पूर्ण केली. प्रमुख अभियंता (पूल)  उत्‍तम श्रोते यांच्‍यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्‍य नियोजन करून तुळई सरकविण्‍याचे काम पार पाडले.

रेल्‍वे सुरक्षिततेच्‍या दृष्‍टिकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्‍याचप्रमाणे रेल्‍वे वाहतूक व वीजपुरवठा या दोन्‍ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्‍यानंतर तुळई स्‍थापनेचे कामकाज पूर्ण करण्‍यात आले आहे. पुलासाठी तुळई स्थापित करणे हे अभियांत्रिकीदृष्‍ट्या अत्यंत आव्हानात्‍मक असे काम आहे. पश्चिम रेल्‍वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्‍वेने निर्देश केल्‍याप्रमाणे मेसर्स राइट्स लिमिटेड यांच्‍या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्‍यात आले आहे.

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाची दक्षिणेकडील मार्गिका सुरू करण्‍यासाठी गर्डर लॉंचिंग हा महत्त्वाचा टप्‍पा आहे. त्‍यादृष्‍टीने रेल्‍वे प्रशासनासमवेत समन्‍वय ठेवून गर्डर लॉंचिंगचे उर्वरित काम सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता प्राधान्याने पूर्ण करण्‍याचा महानगरपालिकेचा प्रयत्‍न राहील.

- अभिजीत बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)

पुढच्या टप्प्यात कोणते काम?

दुसऱ्या टप्‍प्‍यातील म्‍हणजेच दक्षिणेकडील लोखंडी तुळईची जुळवणी रेल्‍वे रुळाच्‍या पूर्व बाजूस जमिनीपासून १४ ते १५ मीटर उंचीवर पूर्ण करण्‍यात आली आहे. ही तुळई पूर्णपणे सरकविल्‍यानंतर रस्‍ता रेषेमध्‍ये तुळई आरसीसी आधार स्‍तंभावर स्‍थानापन्‍न करण्‍यासाठी १४ ते १५ मीटर उंचीवरून ८ मीटर पातळीपर्यंत खाली आणण्‍याचे काम पूर्ण करण्‍यात येईल. एखाद्या पुलाच्या कामात १४ ते १५ मीटर उंचीवरून तुळई विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणणे, असा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. रेल्वे परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

इतर शिल्लक कामे कोणती?

रस्‍ता रेषेमध्‍ये तुळई स्थापन झाल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

आताच्या टप्प्यात काय घडले?

  • ४ सप्‍टेंबर २०२४ रोजी उत्तररात्री महाकाय अशी तुळई रेल्‍वे भागावर २५ मीटरपर्यंत सरकविण्‍याचे काम पूर्ण करण्‍यात आले.

  • याचाच पुढील टप्‍पा म्‍हणून ८ सप्‍टेंबर रोजी रात्री दहा वा.पासून ते सोमवार, ९ सप्‍टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्‍या कालावधीत ही तुळई रेल्‍वे भागावर उर्वरित ६५ मीटरपर्यंत म्‍हणजेच एकूण ९० मीटरपर्यंत सरकविण्‍याचे काम यशस्‍वीपणे पूर्ण करण्‍यात आले आहे.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती