मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रवासी सेवेत आल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड अंतर फक्त २५ मिनिटांत सहज पार करता येणार आहे. १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे. १२.२० किमी लांब जोडरस्त्याच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत भूमिगत बोगद्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळ्या बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.
बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश असेल. पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था करण्यात येईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार आहे.
प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही. प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांनी घट होणार आहे. मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार आहे. जुळ्या बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च ६,३०१.०८ कोटी रुपये असून, जुळ्या बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी ऑक्टोबर २०२८ पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
प्रकल्पाची सद्य:स्थिती
एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर. बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तळमजला + २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला + ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचे फायदे
गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता असून, त्याचा विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे वाहतूककोंडीपासून दिलासा मिळेल. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होईल. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल. इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होईल.
राज्यपाल रमेश बैस या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, केंद्रीय आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहील.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आदींचीही यावेळी उपस्थिती असेल.
असा साकारतोय भूमिगत बोगदा
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) प्रकल्पांतर्गत (तिसरा टप्पा) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा खोदण्यात येणार आहे. जोडमार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किमी हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात असेल. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) बोगद्याचे खोदकाम होणार आहे.