रस्त्यांवर इतरत्र पडणाऱ्या कचऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने भूमिगत कचरापेटी संकल्पना अंमलात आणली, मात्र भूमिगत कचरापेट्यांना जमिनीखाली असलेल्या विविध प्राधिकरणाच्या युटीलिटीजचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे भूमिगत कचरापेटीवर लाखो रुपये खर्चून ही भूमिगत कचरापेटी संकल्पना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी २०३० पर्यंत मुंबई कचरामुक्तीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई कचरा व दुर्गंधीमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना राबवल्या. मुंबई कचरामुक्तीसाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मुंबईतील सोसायट्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्याचे आवाहन केले. यासाठी ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी कचरापेट्याही उपलब्ध करून दिल्या असून, मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. मुंबई महापालिकेने योजना अंमलात आणल्यानंतर मुंबईकरांनी काही दिवस पालन केले, मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणीप्रमाणे पुन्हा तीच उदासिनता दिसून आली. त्यामुळे कचरामुक्त मुंबईसाठी मुंबईकरांची साथ तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, असे मत घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केले. दरम्यान, शहरात भूमिगत कचरापेटी बसवण्यात आल्या असून, पूर्व व पश्चिम उपनगरात भूमिगत कचरापेटी बसवण्याबाबत जागेची पाहणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत सद्यस्थितीत रोज ५ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणारा कचरा देवनार, कांजूर व मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. या ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असून, देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ४ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील या तिन्ही डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात येत असून, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई कचरामुक्तीसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्यासाठी मुंबईकरांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीही रस्त्यात कुठेही कचरा फेकण्याची सवय आजही कायम आहे. मुंबईत इतरत्र कचरा न टाकता कचरापेटीत टाका, असे आवाहन पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले. मात्र कचरापेटीत कचरा टाकल्यानंतर कचरा पुन्हा रस्त्यावर येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मुंबई ठिकठिकाणी भूमिगत कचरापेटी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत गिरगाव, गोराई जेट्टी, अक्सा बीच, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय आदी ११ ठिकाणी १६ भूमिगत कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. एक भूमिगत कचरापेटी बसवण्यासाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र भूमिगत कचरापेटी बसवल्यानंतर त्या जमिनीखाली केबल, पाण्याची पाइपलाइन, बेस्ट उपक्रमाच्या इलेक्ट्रिक सप्लाय विभागाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वायर टाकल्याचे आढळले आहे. त्यामुळे भूमिगत कचरापेटी बसवण्यासाठी जमिनीखाली असलेल्या विविध प्राधिकरणाच्या युटीलिटीजचा अडथळा निर्माण झाला आहे. कचरामुक्त मुंबईसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही स्पर्धेचे आयोजन केले असून हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा, रुग्णालये, खासगी व शासकीय कार्यालये आदी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
रस्त्यांवर अडचण ठरते!
मुंबई कचरामुक्तीसाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच इतरत्र कचरा टाकू नये यासाठी भूमिगत कचरापेटी बसवण्यात येत आहेत. मुंबईतील अनेक रुग्णालयात भूमिगत कचरापेटी बसवण्यात आल्या आहेत, मात्र रस्त्यांवर भूमिगत कचरापेटी बसवण्यात केबल, इलेक्ट्रिक वायरिंग अशा विविध युटीलिटीजचा अडथळा येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात भूमिगत कचरापेटी बसवण्यात येत आहेत.
- चंदा जाधव, उपायुक्त, व्यवस्थापन विभाग
कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे!
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियंत्रण विभागामार्फत ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण केले जाते. मात्र या मोहिमेला वेग न देता भूमिगत कचरापेटी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भूमिगत कचरापेटी संकल्पना फोल ठरली असून, ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण यावर मुंबई महापालिकेने भर द्यावा.
- सचिन मांजरेकर, ईशान्य मुंबई, जिल्हा महासचिव कॉंग्रेस
येथे भूमिगत कचरापेटी बसवणार
केईएम रुग्णालय- ६
सायन रुग्णालय - ४
छोटा सायन रुग्णालय, धारावी- १
चिंचपोकळी कस्तुरबा रुग्णालय- २
जीटी रुग्णालय- ३
येथे भूमिगत कचरापेटी बसवल्या
गिरगाव चौपाटी- १
गोराई जेट्टी- १
अक्सा बीच- १
राणी बाग- १
कुलाबा अफगाण चर्च- १
नायर रुग्णालय- २
चेंबूर पूर्व- १
जुहू बीच- २
जुने कस्टम हाऊस- १